
लाखनी,दि.01ः-लाखनी तालुक्यातील इसापूर येथे दुचाकी अनियंत्रित होऊन वळणावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या चिंचेच्या झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवक जागीच ठार झाल्याची घटना आज 1 मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली.मृतकाचे नाव दिनेश रोशन बोरकर 22 रा. जेवनाळा तालुका लाखनी असे आहे.
मृतक दिनेश बोरकरला प्रतापगड यात्रेवर जायचे होते.पण अचानक त्याचा मित्र आला आणि गावी सोडण्याची विनंती केल्याने त्याला सोडण्याकरिता आपली सुपर स्प्लेंडर मोटार सायकल एमएच 40BQ 6772 ने इसापूर येथे गेला.यात्रेवर जाण्यास उशीर होत असल्यामुळे परतीच्या प्रवासात भरधाव वेगाने गावाकडे येत असताना इसापूर जेवणाळा रस्त्यावरील नहराचे वळणावर दुचाकी अनियंत्रित होऊन रस्त्याचे कडेला असलेल्या चिंचेच्या झाडास धडक दिल्याने अपघात होवून तो जागीच ठार झाला .घटनेची माहिती इसापुरचे पोलीस पाटील लांडगे यांनी पालांदुर पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळी येवून सर्व सोपस्कार आटोपून मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले.मृतदेह उत्तरीय परिक्षणांनतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून स्थानिक स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पालांदुर पोलिसांनी अप क्र. 21/2022 अन्वये गुन्हा दाखल केला असून कलम 279,304(अ) भादवी नुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरकुटे यांचे मार्गदर्शनात पोलीस नायक मंगेश पुरसाम अधिक तपास करीत आहेत.





