
गोंदिया,दि.13ः: दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ब्रिटिश सरकारने१९४२-४३ मध्येतालुक्यातील बिरसी येथे विमानतळाची उभारणी केली. सन २००५ मध्येतत्कालीन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ तयार केले. मात्र या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवेला प्रारंभ झाला नव्हता. यानंतर शासनाच्या उड्डाण योजनेतंर्गत तब्बल ७९ वर्षांनंतर येत्या आज १३ मार्चपासून प्रवासी वाहतूक सेवेचे टेकऑफ हाेणार आहे. बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असून १२६ हेक्टरवर याचे क्षेत्र व्यापले आहे. इंदोर-गोंदिया व गोंदिया- हैद्राबाद या दोन्ही मार्गावर 70 प्रवासी पुर्ण बुकींग झाले आहे.
या निमित्ताने एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून केंद्रीय विमान वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया हे गोंदिया-हैद्राबाद विमानसेवेला सकाळी 11.30 वाजता व्हर्चुवल हिरवी झेंडी दाखवणार आहेत. कार्यक्रमाला खासदार सुनील मेंढे,खासदार अशोक नेते, बालाघाटचे खासदार ढालसिंह बिसेन,आमदार विनोद अग्रवाल,अभिजित वंजारी,डाॅ.परिणय पुके,नागो गाणार,विजय रहागंडाले,मनोहर चद्रिकापूरे,सहसराम कोरेटे,बालाघाटचे आमदार गौरीशंकर बिसेन,माजी आमदार राजेंद्र जैन जिल्हाधिकारी नयना गुंडे, ,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, विमान पतन अधिकारी बैजू , सदस्य गजेंद्र फुंडे,डॉ. प्रशांत कटरे उपस्थित राहणार आहेत.
खा.पटेलांनी विमानतळच तयार केले नसते तर…..
विशेष म्हणजे आजपर्यंतच्या राजकारणात नेहमीच विरोधी पक्षाने खासदार प्रफुल पटेल यांनी स्वतःसाठीच हे विमानतळ सुरु केले,याचा जनतेला काय लाभ असे म्हणत टोमणे मारण्याचे काम भाजप नेत्यांनी केले होते.मात्र खा.पटेलांनी अत्याधुनिक सेवा असलेले विमानतळच याठिकाणी केंद्रीय विमानवाहतुक मंत्री असताना तयार केले नसते तर आज या विमानतळावरुन प्रवासी विमान उडाले असते काय अशा प्रश्नही आता विचारला जाऊ लागला आहे.विशेष म्हणजे प्रफुल पटेल हे राज्यसभेचे खासदार असूनही त्यांचे नाव पत्रिके फ्लायबिग कंपनीने टाकलेले नाही.
उदघाटन सोहळ्याला राज्य सरकारचा एकही प्रतिनिधी नाही
गोंदियावरुन पहिल्यांदाच प्रवासी विमान सेवा सुरु होत असताना राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच जिल्ह्याचे संपर्क मंत्री यांना मात्र पत्रिकेत व कार्यक्रमात डावलण्यात आले आहे.
खासदार सुनील मेंढे म्हणतात…
सर्व शहरांना देशाशी जोडण्याच्या विचार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. कमी दरात हवाई प्रवास करण्याची संधी या योजनेअंतर्गत उपलब्ध झाली आहे. बिरसी विमानतळावरून सुरू होत असलेली विमान सेवा त्याचाच एक भाग आहे. खासदार झाल्यानंतर सुनील मेंढे यांनी सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा केला. विमानतळ प्राधिकरण, नागरी उड्डाण मंत्रालयातील सर्व प्रमुख अधिकारी आणि मंत्र्यांना भेटले. खासदारांनी प्रवासी वाहतूक सुरू होणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले. वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी दूर केल्या. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या गेल्या, असं भाजपाचे खासदार सुनील मेंढे यांचे म्हणणे आहे.
खासदार प्रफुल पटेल म्हणतात…
केंद्र सरकारमध्ये नागरी विमान मंत्री असताना गोंदियाच्या भविष्याचा विचार केला. बिरसी येथे असलेल्या इंग्रज काळातील विमानतळाला नवीन स्वरूप दिले. दिवसा तसेच रात्री विमाने उतरतील, अशी व्यवस्था केली. त्याच धावपट्टीवरून 13 मार्च रोजी विमान वाहतूक सेवा सुरू होत आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व माजी कृषी मंत्री शरद पवार यांचे सरकार असताना या सेवेचे प्लानिंग केले होते. बिरसी येथील विमानतळाला अत्याधुनिक विमानतळाच्या दर्जा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी विमानतळाची व्यवस्था केली. त्यामुळं ही विमानसेवा सुरू होत असल्याचं प्रफुल पटेल यांच्या कार्यालयातून जारी झालेल्या पत्रकात म्हटलं आहे.





