
गोरेगांव,दि.16:-येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित उपविभाग कार्यालयात कृषी वीज ग्राहक तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य डॉ.लक्ष्मण भगत यांनी कृषी पंपाची रीडिंग योग्य पद्धतीने न घेता अंदाजीत बिल दिले जात आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील मीटर बंद किंवा जळलेले असून त्यांची दुरुस्ती केली जात नाही . डिमांड भरून दोन वर्षे झाले पण अजूनही वीज जोडणी करण्यात आलेली नाही. आणि सध्या रब्बी पिकाची शेतकऱ्यांनी लागवड केली असताना कसलीही सूचना न देता महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. परिणामी पीक वाचविण्यात अपयश येत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे तरीपण ह्या बळीराजाच्या समस्याचे लवकरात लवकर निराकरण करण्यात यावे अन्यथा शेतकऱ्यांच्या सोबत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने जि.प.सदस्य डॉ. लक्ष्मण भगत यांनी दिला.
कृषी वीज ग्राहकांना कृषी पंपाचा वीज पन्नास टक्के सवलत मिळविण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत असून त्यापूर्वी थकबाकी मुक्ति योजनेचा लाभ मिळावा म्हणून त्वरित या योजनेचा लाभ घ्यावा. या ग्राहक मेळावा कार्यक्रमात वीज ग्राहकांच्या वीज देयक, नवीन वीज जोडणी नावात बदल या विषयाबाबत तक्रारीचे निराकरण करण्यात येतील असे आवाहन कार्यकारी अभियंता यांनी केले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य पंकज रहागंडाले,जितेंद्र कटरे,पंचायत समिती सदस्य ओमप्रकाश कटरे आदी उपस्थित होते.





