35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ पाण्याचा काटकसरीने वापर करा-मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांचे आवाहन

पाण्याचा काटकसरीने वापर करा-मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांचे आवाहन

0
49

blank

जलजागृती सप्ताहाचा उद्घाटन सोहळा थाटात.
——
गोंदिया, ता. 16 : पाणी हे जीवन आहे. पाण्याची निर्मीती शक्य नाही. भुगर्भातील पाण्याचा मोठयाप्रमाणात उपसा होतो. त्याचे दुरगामी परिणाम येणाऱ्या पिढीला भोगावेच लागतील. पाण्याचा अपव्यय होणार नाही; याची दक्षता घेवून पाण्याचा काटकसरीने वापर करा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले. जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये आज (ता. 16) जलजागृती सप्ताहाची जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली. त्याच्या उद्घाटन सोहळयात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शितल पुंड, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  नरेश भांडारकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता  सुमित बेलपत्रे, पंचायत समितीचे सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व जलपूजन करण्यात आले. दरम्यान जलसंवर्धनासाठी  मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी उपस्थितांना जल शपथ दिली. अभियान हे काही कालावधीपुरते मर्यादीत असतात. त्या कालावधीत ते राबविले जातात. मात्र, नित्य कार्य केल्यास अभियान राबविण्याची गरजच भासणार नाही. प्रत्येक घरी नळजोडणी करायची आहे. त्यादृष्टीने कामाला लागून मार्च अखेर पर्यंत सर्व उद्दीष्ट पूर्ण करण्याच निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकारी  अनिल पाटील यांनी याप्रसंगी दिले. पाणी आणि स्वच्छता हा नित्याचा विषय आहे. त्यामुळे त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त करून शौचालय बांधकाम व नळजोडणी करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर भेटी देण्याचे अवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर यांनी केले. प्रत्येक गावात पाणी पुरवठा योजना देण्याचे शासनाचे धोरण आहे. जलजीवन मिशन मधून या योजना सुरू करण्यात येतील. योजना योग्य प्रकारे कार्यान्वित राहतील याकडे लक्ष देवून पाणी पुरवठा योजना भविष्यातील पांढरा हत्ती ठरू नये, याची दक्षता घेण्याचे मत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता  सुमित बेलपत्रे यांनी व्यक्त केले. माहिती शिक्षण व संवाद तज्ञ  राजेश उखळकर यांनी जल जागृती सप्तांहांतर्गत करावयाच्या कार्यवाहीची माहिती दिली. तर पाणी गुणवत्ता तज्ञ मुकेश त्रिपाठी यांनी एफटीके कीटच्या माध्यमातून करावयाच्या पाणी स्रोतांबाबची कार्यवाही विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती शिक्षण व संवाद तज्ञ अतुल गजभिये यांनी केले. यशस्वीतेसाठी सनियंत्रण व मुल्यमापन तज्ञ विशाल मेश्राम, संनियत्रण व मुल्यमापन तज्ञ श्रीमती शोभा फटींग, मनुष्यबळ विकास तज्ञ तृप्ती साकुरे आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
blank
परसवाडयात जलपूजन
ग्रामीण भागात पाणी संवर्धनाचे महत्व अधोरेखीत करण्यासाठी गोंदिया तालुक्यातील परसवाडा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी  अनिल पाटील यांच्या हस्ते परसवाडा तलावाच्या काठावर जलपुजनाचा कार्यक्रम पार पडला. परिसरातील सर्व सरपंच, ग्रामसेवक यावेळी मोठयासंख्येने उपस्थित होते. यावेळी सरपंच यांच्याशी गाव विकासाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी  अनिल पाटील यांनी संवाद साधला.

blank