29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता दोन दुचाकींची धडक; माजी जि. प. सदस्यासह एकाचा मृत्यू

दोन दुचाकींची धडक; माजी जि. प. सदस्यासह एकाचा मृत्यू

0
153

blank

पारशिवनी– पोलिस स्टेशन हद्दीतील करंभाडजवळ बुधवारी (१६ मार्च) दुपारी ३.४५ वाजता आमनेसामने दुचाकींची धडक झाल्यामुळे दोन्ही दुचाकी चालकांचा मृत्यू झाला. मृतकामध्ये माजी जि. प. सदस्य कमलाकर मेंघर (वय ६३) व प्रकाश सावरकर (वय २८, दोन्ही रा. पारशिवनी) यांचा समावेश आहे.
सविस्तर वृत्त असे की, घटनेच्या दिवशी कमलाकर मेंघर आपली दुचाकी क्र. एम. एच. ४0 / यू. ४३४८ घेऊन करंभाड शिवारातील शेताकडे जात असताना तेवढय़ातच करंभाडजवळ प्रकाश सावरकर हा निंबा येथील सूतगिरणी कंपनीत कार्यरत असल्याने कंपनीतून सावनेर ते पारशिवनी मार्गे या महामार्गावर विरुद्ध दिशेने दुचाकी क्र. एम. एच. ४0 / बी. पी. 0७६२ चालवत अतिशय जलदगतीने जात होता. तेव्हा प्रकाशची दुचाकी अत्यंत जलद गतीने असल्याने समोरील दुचाकीला पाहुन त्याला वेग नियत्रित करता आला नाही. त्यामुळे कमलाकर मेंघर व प्रकाश सावरकर यांची करंभाड शिवारातील सूत गिरणीजवळ जबरदस्त आमनेसामने धडक झाली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. यापैकी प्रकाश सावरकर हा जागीच मृत पावला. घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिस घटनास्थळी दाखल होऊन जखमी कमलाकर मेंघर यांना वैद्यकीय उपचारासाठी नेत असताना त्यांनी प्राणज्योत मालवली. यामुळे दोन्ही मृतकांना ग्रामीण रुग्णालय पारशिवनी येथे शवविच्छेदन करण्यासाठी हलविण्यात आले.
घटनेची तक्रार पारशिवनी पोलिसात दिल्यामुळे प्रकरण तपासात घेतले. कमलाकर मेंघर हे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे निकटचे असल्याने भाजप पक्षासह परिसरात दु:खद वातावरण निर्माण झाले आहे. मेंघर यांच्या पार्थिव शरीरावर गुरुवारी (१७ मार्च) करंभाड येथील शेतावर सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहे.

blank