
भंडारा–भांडणाचा वचपा काढण्यासाठी एका तरुणाला घरातून उचलून वैनगंगेच्या जुन्या पुलावर नेण्यात आले. तिथे तलवारीने वार करुन त्याचा खून करुन मृतदेह नदीत फेकले. सात दिवसानंतर त्याचा मृतदेह आढळून आला. ही धक्कादायक घटना गुरुवार, १७ मार्च रोजी संध्याकाळी वैनगंगा नदीपात्रात उघडकीस आली. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
महेंद्र उर्फ टिंकू संतोष दहिवले (वय ३६) रा. सुभाष वॉर्ड, बेला असे मृतकाचे नाव आहे. तर शुभम उर्फ आर्यन नंदकिशोर मंदूरकर (वय २१) रा. कृष्ण मंदिर वॉर्ड भंडारा, निशान उर्फ अम्मू अनिल कटकवार (वय १९) रा. चांदणी चौक भंडारा, दिपांशू उर्फ बिट्ट सुभाष शहारे (वय २0) रा. आंबेडकर वॉर्ड भंडारा, हेमंत उर्फ भांजा रा. टप्पा वॉर्ड भंडारा अशी आरोपींची नावे आहेत.
९ मार्च रोजी महेंद्र आणि आरोपी शुभम मंदूरकर यांच्यात भांडण झाले होते. या भांडणाचा वचपा काढण्यासाठी १0 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी शुभम, निशाण आणि दिपांशू हे दुचाकी क्र. एम. एच. ३६ / ए. जे. ३९९९ ने महेंद्रच्या बेला येथील घरी गेले. त्याला फिरायला जाऊ, असे सांगत बाहेर घेऊन गेले. त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी महेंद्रला वैनगंगा नदीच्या जुन्या पुलावर आणले. त्याठिकाणी त्याला जबर मारहाण करण्यात आली. त्याच्या शरिरावर तलवारीने वार करून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह वैनगंगा नदीत फेकून देण्यात आला. महेंद्रचा मृतदेह बासाच्या काठीने पाण्यात बुडविले.
इकडे, महेंद्र बेपत्ता असल्याने त्याच्या कुटूंबियांनी १४ मार्च रोजी भंडारा पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली. दरम्यान, १७ मार्च रोजी त्याचा मृतदेह वैनगंगा नदीपात्रात आढळून आला. भंडारा पोलिसांनी तत्काळ तपासकार्याचा वेग वाढविला. तपासाअंती आरोपींना अटक करण्यात आली.
याप्रकरणी भंडारा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३६४, ३0२, २0१, १२0 (ब), ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक केदार करीत आहेत.





