
पुसद येथील लक्ष्मीनगरातील दुर्दैवी घटना
पुसद,ता.23–सिमेंटच्या खांबाला बांधलेल्या पाळण्यातील भावाला झोका देत असताना अचानक खांब कोसळल्याने .चिमुकल्या बहिण-भावाचा करूण अंत झाला.ही घटना पुसद येथील लक्ष्मीनगरातील शेतातील गोठ्यावर मंगळवारी ता.22 रोजी घडली.तेजस विजय घुक्से (वय सहा महिने) व प्राची विजय घुक्से ( वय नऊ वर्षे) .अशी मृत भावंडांची नावे आहेत.या घटनेची पोलिसांत नोंद नसून आज उघडकीस आली.
खरेतर पाळणा हा प्रत्येक बाळाला आवडतो. चिमुकले पाळण्यात झोक्यासोबतच झोपी जातात. मात्र हाच पाळणा दोन चिमुकल्यांच्या जीवावर उठला. विजय घुक्से हे शेतकरी पुसद येथील महावीर नगरात राहतात. त्यांना चार अपत्ये आहेत. त्यांचे बाजूच्याच लक्ष्मीनगरात शेत आहे. याच शेतात विजय घूक्से शेतातील गाजर काढण्यात व्यस्त होते. तर आई सारिका ही सहा महिन्याच्या तेजस बाळाला साडीने सिमेंट खांबाला बांधलेल्या पाळण्याला झोका देत होती.
बुधवारी सकाळी अकरा वाजता प्राची शाळा आटोपून शेतात आली. भूक लागल्याने आईला जेवण देण्याची विनंती केली. मात्र आईने तेजसला झोका दे, असे म्हणून ती पाणी आणण्यासाठी घरात गेली. एवढ्यातच पाळणा बांधलेला सिमेंटचा खांब अचानक तुटून प्राचीच्या डोक्यावर कोसळला व प्राची बेशुद्ध झाली तर पाळण्यातील चिमुकला तेजस जोरात बाजूला फेकल्या गेला.
आई सारिका पाणी घेऊन बाहेर आल्यावर संपूर्ण प्रकार पाहताच तिला जबर धक्का बसला आणि आरडाओरडा केला. वडील विजय यांनी दोन्ही चिमुकल्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारार्थ नेले. मात्र डॉक्टरांनी प्राचीला मृत घोषित केले तर तेजसला नांदेड येथे वैद्यकीय उपचारासाठी पाठविण्यात आले. परंतु वाटेतच त्याचीही प्राणज्योत मालवली.निकृष्ट दर्जाच्या सिमेंट खांबामुळे हा अपघात घडला असून या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





