
गोंदिया,दि.23 ः जिल्हा परिषद व पंचायत समितीत अध्यक्ष व सभापतींची निवड त्वरित करण्यात यावी, या मागणीचे निवेदन ओबीसी संघर्ष कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांसह ग्रामविकास मंत्र्यांना पाठविले आहे. लोकप्रतिनिधीअभावी सर्वसामान्यांना प्रचंड समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. समान तारखांना निवडणुका होऊन नगर पंचायतीमध्ये पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे. मात्र, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या बाबतीत ग्रामविकास मंत्रालय अडवणुकीची भूमिका का घेत आहे?, राज्य सरकार आणि ग्रामविकास मंत्रालयाने या संदर्भातील भूमिका काय ते २५ मार्चपर्यंत कळवावी, याबाबतची भूमिका स्पष्ट न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असे संघर्ष समितीने निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य आनंदा वाढीवा, विमल कटरे, पंचायत समिती सदस्य मुनेश रहांगडाले, ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष बबलू कटरे, खेमेंद्र कटरे,जिल्हा सचिव उद्धव मेहेंदळे, कार्याध्यक्ष अमर वराडे,माजी जि.प.सदस्य रत्नदीप दहीवले,जि प सदस्य जितेंद्र कटरे,निपल बरैय्या उपस्थित होते.





