
गोंदिया,दि.23ः लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सालेकसा पोलिस ठाण्याच्या पोलिस हवालदाराला 14 हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज, 23 मार्च रोजी करण्यात आली. विजय हुमणे असे पोलिस हवालदाराचे नाव आहे. तक्रारकर्ते हे शेतकरी असून त्यांचे व त्यांच्या मुलाचे शेजारी राहणार्या कुटूंबासोबत 19 मार्च रोजी नालीच्या पाण्यावरुन वाद झाला होता. याप्रकरणी शेजारी कुटूंबीयाच्या तक्रारीवरुन सालेकसा पोलिसांनी तक्रारकर्ते व त्यांच्या मुलावर भादंवि 324 अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार हुमणे यांच्याकडे होता. दरम्यान त्याच दिवशी पोलिस हवालदार हुमणे यांनी तक्रारकर्त्याला पोलिस ठाण्यात बोलावून गुन्ह्यात अटक न करता परस्पर न्यायालयात उभे करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागितली. मात्र तक्रारकर्त्याला लाच द्यायची नसल्याने त्यांनी 21 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली. दरम्यान, 22 मार्च रोजी पडताळणीत लाच मागणीची खात्री पटल्याने आज, 23 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सालेकसा येथील बाजार चौकातील एका चहा टपरीवर सापळा रचला व हुमणे यांना तक्रारकर्त्याकडून तडजोडीअंती 14 हजार रुपये लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. हुमणे यांच्यावर कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये सालेकसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहायक फौजदार पुरुपुषोत्तम अहेकर, पोलिस हवालदार राजेश शेंद्रे, नायक
पोलिस शिपाई मंगेश कहालकर, अशोक कापसे, संतोष शेंडे, संतोष बोपचे यांनी केली.





