38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ २८ मार्च रोजी विद्यापीठात ‘ भुरा’आत्मकथनावर परिसंवाद व लेखकाशी मुक्त संवाद

२८ मार्च रोजी विद्यापीठात ‘ भुरा’आत्मकथनावर परिसंवाद व लेखकाशी मुक्त संवाद

0
19

blank

अमरावती,दि.27 मार्च – मराठी साहित्याच्या क्षेत्रात सध्या गाजत असलेल्या ‘भुरा ‘ या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांच्या आत्मकथनावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या डॉ. के .जी . देशमुख सभागृहात सोमवार,दि. २८ मार्च ,२०२२ रोजी, दुपारी २.०० वाजता परिसंवादाचे आयोजन केले आहे . परिसंवादानंतर या आत्मकथनाचे लेखक प्रा . शरद बाविस्कर यांच्याशी मुक्तसंवाद साधण्याची संधीही रसिक वाचकांना मिळणार आहे . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठी विभागप्रमुख डॉ. मोना चिमोटे भूषवतील. तर या कार्यक्रमाला आय आय एम सीचे संचालक डॉ.व्ही.के .भारती यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. विद्यापीठाचा मराठी विभाग आणि भारतीय जनसंचार संस्थान ( आयआयएमसी) ,अमरावती यांनी संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमाचा लाभ रसिकांनी घ्यावा , असे आवाहन आयोजकांनी केले आहे .
धुळे जिल्ह्यातील रावेर या लहानशा खेड्यात,एका कोरडवाहू शेतकऱ्याच्या घरात जन्मलेले, रोजंदारीवर पडेल ते काम करून भाषाशिक्षण आणि तत्त्वज्ञानाच्या ओढीने वेगवेगळ्या देशांतील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिकलेले,तत्त्वज्ञानासारख्या गहन आणि गंभीर विषयाच्या अभ्यासाने समृद्ध झालेले, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, (JNU) नवी दिल्ली,येथे कार्यरत असलेले प्रा.शरद बाविस्कर यांचे ‘ भुरा ‘ हे आत्मकथन सध्या सर्वत्र गाजत असून
एका वर्षात त्याची चौथी आवृत्ती बाजारात आली आहे . या लोकप्रिय आत्मकथनाच्या निमित्ताने लेखकाशी संवाद साधण्याची व त्याचा प्रेरणादायी प्रवास ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे . या संधीचा फायदा साहित्यप्रेमी रसिकांनी घ्यावा असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ . तुषार देशमुख आणि आय. आय. एम. सी. चे प्रा.अनिल जाधव यांनी केले आहे.

blank