राणा दाम्पत्याला न्यायालयाकडून सशर्त जामीन:माध्यमांशी बोलण्यास मनाई

0
41

मुंबई-23 एप्रिलपासून राजद्रोहाच्या आरोपाखाली भायखळा तुरुंगात असलेल्या अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 30 एप्रिल रोजीच न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल 2 मेपर्यंत राखून ठेवला होता. न्यायालयाने त्यांना आता सशर्त जामीन मंजूर केला आहे.

दोघांनाही 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला आहे. सोमवारी वाढीव मुदतीमुळे मुंबईच्या दिवाणी व सत्र न्यायालयाचे उर्वरित न्यायाधीश आर. एन. रोकडे यांची ऑर्डर पूर्ण होऊ शकली नव्हती.

न्यायालयाच्या या आहेत 4 अटी…

राणा दाम्पत्याने चौकशीत सहभागी होत राहावे
अशा प्रकारचे आणखी कोणतेही वादविवाद करू नये
पुराव्यांशी छेडछाड करू नये
या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही पत्रकार परिषद घेणार नाही
नवनीत राणा यांचे वकील रिझवान मर्चंट मुंबईबाहेर जाण्याच्या अटींबाबत म्हणाले की, आतापर्यंत केवळ ऑर्डरचा ऑपरेटिव्ह भाग आमच्याकडे आला आहे. आम्ही अमरावतीला जाऊ शकू की नाही, हे पूर्ण ऑर्डर आल्यावरच सांगता येईल.

तुरुंगात बिघडली नवनीत राणांची प्रकृती

तुरुंगात असलेल्या नवनीत राणा यांच्या पाठीत रात्री उशिरा अचानक वेदना वाढल्या. त्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात सीटी स्कॅनसाठी नेण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र, त्यांना कोणत्याही रुग्णालयात हलवण्यात आलेले नाही.

राणा दाम्पत्याविरुद्ध भादंविच्या कलम 15A, 353 तसेच मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याशिवाय राणा दाम्पत्यावर 124A म्हणजेच देशद्रोहाचा गुन्हाही दाखल आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचे आवाहन केल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. राणा दाम्पत्याला 6 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीचा आदेश होता.

पोलिसांचा जामिनाला विरोध

शुक्रवारी झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही बाजूंच्या वकिलांनी सुमारे अडीच तास युक्तिवाद केला. राणा दाम्पत्यावर धार्मिक भावना भडकावल्याचा आणि देशद्रोहाचा आरोप आहे. याशिवाय अन्य एका एफआयआरमध्ये त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोपही आहे. राणा दाम्पत्याच्या वतीने रिझवान मर्चंट आणि आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला, तर मुंबईतील खार पोलिसांच्या वतीने सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जामीन अर्जाला विरोध केला.

BMCचे पथक राणा दाम्पत्याच्या खार येथील घरी जाणार

राणा दांपत्याच्या खार येथील घरात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार असून त्याची मुंबई महापालिकेकडून तपासणी करण्यात येणार आहे. याबाबत पालिकेच्या एच पश्चिम विभाग कार्यालयाकडून तशी नोटीस पाठवण्यात आली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांचे खार येथे घर असून ज्या इमारतीत हे घर आहे त्या इमारतीबाबत अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. इमारतीतील अनेक सदनिकांमध्ये मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अधिकचे बांधकाम करण्यात आले आहे, पालिकेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे, अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याने मुंबई महापालिकेने तपासणीसाठी कलम ४८८ नुसार अनेक सदनिकाधारकांना नोटिसा पाठवल्या आहेत. त्याप्रमाणेच राणा यांच्या घरालाही नोटीस पाठवण्यात आली आहे.

बुधवार, ४ मे रोजी मुंबई महापालिकेचे पथक तपासणीसाठी या इमारतीत जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पालिकेच्या वांद्रे एच पश्चिम विभागाचे सहायक विनायक विसपुते यांनीही या माहितीस दुजोरा दिला आहे.

मुंबई पोलिसांनी न्यायालयात मांडली बाजू

न्यायालयात जामिनाला विरोध करताना मुंबई पोलिसांनी सांगितले की, नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप आहेत. राणा दाम्पत्य तुरुंगातून बाहेर पडून प्रकरणावर प्रभाव टाकू शकते, असा सरकारचा युक्तिवाद आहे. कलम 149 ची नोटीस असतानाही राणा दाम्पत्याने एका मुलाखतीत राज्य सरकारला खुले आव्हान दिल्याचेही पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. हे प्रकरण सांगितले जात आहे तितके सरळ आणि साधे नाही.

राणा दाम्पत्याचा उद्देश केवळ हनुमान चालिसा वाचणे हा नव्हता. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवून ठाकरे सरकारला आव्हान देण्याचा त्यांचा हेतू होता. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वालाच आव्हान देण्याचा डाव राणा दाम्पत्याने रचला होता.

पोलिसांनी आधीच कलम 149 अन्वये नोटीस देऊन त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचण्याचा आग्रह का धरला? कारण ते अराजकतेची स्थिती निर्माण करू पाहत होते, असा एकूण युक्तिवाद होता.

बचावा पक्षाचा असा होता युक्तिवाद

दुसरीकडे राणा दाम्पत्याच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की, राणा दाम्पत्य हे जबाबदार नागरिक असून ते प्रत्येक अटी पाळतील. सुनावणीदरम्यान वकिलाने देशद्रोहाच्या आरोपावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यादरम्यान वकिलाने राणा दाम्पत्याच्या 8 वर्षांच्या मुलीचाही संदर्भ दिला. मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानाजवळ हनुमान चालीसाचे पठण करून द्वेष निर्माण करण्याचा याचिकाकर्त्यांचा हेतू नसल्यामुळे कलम 153 (ए) अंतर्गत आरोप कायम ठेवता येणार नाही, असे राणा दाम्पत्याने याचिकेत म्हटले आहे.

नवनीत राणा यांचे राऊत यांच्यावर गंभीर आरोप

खासदार नवनीत राणा यांनी दिल्लीचे सीपी राकेश अस्थाना यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर अपमानास्पद आणि जातीयवादी वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे. खासदार राणा यांनी राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नवनीत आणि रवी राणा यांच्या तक्रारींबाबत दिल्ली पोलिसांनी डीजीपी महाराष्ट्र यांना एक प्रत पाठवली आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, “हे प्रकरण खार पोलिस स्टेशनशी संबंधित असल्याने, खासदार नवनीत रवी राणा यांची तक्रार आवश्यक कारवाईसाठी पाठवली जात आहे.”

यावरून सुरू झाला वाद

नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घर असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याची घोषणा केल्याने संपूर्ण वाद सुरू झाला. या घोषणेनंतर शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नवनीत राणांविरोधात निदर्शने केली. त्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार पती रवी राणा यांनी 23 एप्रिल रोजी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची त्यांची योजना रद्द केली असली तरी पोलिसांनी त्यांना अटक करून तुरुंगात पाठवले