34.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ गोंदिया जि.प.त पहिल्यांदाच राष्ट्रवादी सत्तेत,अध्यक्षपदी भाजपचे रहागंडाले,उपाध्यक्ष राकाँचे गणवीर

गोंदिया जि.प.त पहिल्यांदाच राष्ट्रवादी सत्तेत,अध्यक्षपदी भाजपचे रहागंडाले,उपाध्यक्ष राकाँचे गणवीर

0
342

blank

गोंदियात फुटली महाविकासआघाडीत बिघाडी

भाजपचे रहांगडाले अध्यक्ष, रॉंकाचे गणवीर उपाध्यक्ष : ‘चाबी’चेही भाजपला समर्थन

जिल्हा परिषद स्थापनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदाच सत्तेत

गोंदिया,दि.10-  जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजपला एका सदस्याची गरज होती. भाजपमधून दोन बंडखोरी करत निवडणूक लढलेले उमेदवार निवडून आले. त्यांनी भाजपला समर्थन दिल्याने भाजपची सदस्यसंख्या 28 झाली होती. त्यामुळे भाजपची सत्ता स्थापन होणार हे सोमवारीच स्पष्ट झाले होते. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आठ आणि चाबी संघटनेच्या 4 सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजप समर्थित गटाची सदस्यसंख्या 40 झाली. आज, मंगळवारी पार पडलेल्या विशेष सभेत अध्यक्षपदी भाजपचे पंकज रहांगडाले आणि उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे यशवंत गणवीर यांची निवड झाली,त्याना समान 40 मते पडली.तर महाविकास आघाडीत फाटाफूट झाली असून कॉंग्रेस मात्र एकाकी पडली.काँग्रेसचे अध्यक्षपदाच्या उमेदवार उषा मेंढे व उपाध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र कटरे यांना समान 13 मते पडली.तब्बल 20 वर्षाचा कालखंडानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेच्या सत्तेत भाजपसोबत सहभागी.जेव्हा की नेहमी काँग्रेस भाजपसोबत सत्तेत असायची ,ती यावेळी बाहेर राहीली.

जिल्हा परिषद म्हणजे जिल्ह्याचे मिनिमंत्रालय. या संस्थेतून जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात विकासाच्या योजना आखून त्या पूर्ण करण्याकरिता अंमलबजावणी करण्यात येते. कोरोनाकाळात जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. जिल्हा परिषदेचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या प्रशासकांकडे देण्यात आला होता. कोरोना संक्रमणाचा प्रभाव असल्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर पडली होती. तिसऱ्या टप्प्यातील संक्रमण आटोक्यात आल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. जिल्हा परिषद सदस्यांकिरता दोन टप्प्यांत निवडणूक घेण्यात आली. त्याचा निकाल 19 जानेवारी रोजी जाहीर झाला. त्यात भाजपला 26, कॉंग्रेस 13, राष्ट्रवादी कॉंग्रेस 8, चाबी संघटनेचे 4 आणि भाजपतून फुटलेले दोन अपक्ष सदस्य निवडून आले. सत्ता स्थापन करण्याकरिता 27 सदस्यसंख्या असणे गरजेचे होते. मात्र भाजपकडे एक सदस्य कमी होता. भाजपमध्ये बंडखोरी करून निवडून आलेले सदस्य देखील तटस्थ होते. परिणामी भाजपच्या बंडखोरांना हेरून चाबी संघटनेच्या सदस्यांच्या मदतीने महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचे स्वप्न बघू लागले होते. मात्र जिल्हा भाजपने दोन्ही अपक्षांची मनधरणी केली. त्यानंतर सोमवारी भाजपच्या सत्ता स्थापनेचे चित्र स्पष्ट झाले होते. ऐनवेळी कॉंग्रेसने अडवणुकीची भूमिका घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीने करत भाजपला समर्थन दिले. चाबी संघटनेच्या ४ सदस्यांनी देखील भाजपला समर्थन दिले. त्यामुळे भाजपच्या गटाचे 40, तर कॉंग्रेसकडे 13 सदस्यसंख्या होती. जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच कॉंग्रेसवर विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे.blank

राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदाच सत्तेत

जिल्हा परिषदेच्या राजकारणाकडे बघितले गेल्यास 2000 मध्ये पहिल्यांदा स्थापन झालेल्या जिल्हापरिषदेपासून बघितल्यास काँग्रेस राष्ट्रवादीची कधीही युती झाली नाही.नेहमी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली.20 वर्ष राष्ट्रवादीला सत्तेबाहेर राहावे लागले.तर यावेळी मात्र नेहमी सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी झाली आहे.

कॉंग्रेसच्या एकांगी भूमिकेमुळे निर्णय

राज्यात महाविकास आघाडी आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत देखील महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला. सुरुवातीपासूनच आम्ही महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याची भूमिका घेतली. मात्र कॉंग्रेसच्या वरिष्ठांनी एकांगी भूमिका घेतली. त्यामुळे आम्हाला देखील सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घ्यावा लागला.-गंगाधर परशुरामकर, जिल्हाध्यक्ष रॉंका

आता लक्ष सभापतीपदांकडे

गेल्या तीन महिन्यांपासून सत्ता स्थापनेकडे जिल्हावासींचे लक्ष लागले आहे. आज अडीच वर्षांकरिता अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाकरिता मतदान घेण्यात आले. त्यात भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, चाबी संघटन आणि दोन अपक्ष यांनी मिळून सत्ता स्थापन केली. अडीच वर्षांकरिता भाजपला अध्यक्ष, तर राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद मिळाले. आता विषय समिती सभापतीपदाकडे लक्ष लागले आहे. यात दोन अपक्षांना प्रत्येकी एक, चाबी संघटनेला एक आणि भाजपला एक सभापतीपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

युती भद्र, की अभद्र,भाजप कार्यकर्त्यात नाराजी

यापूर्वी जिल्हा परिषदेत कॉंग्रेसने युतीधर्म नाकारात राष्ट्रवादी कॉंग्रेसला बाजूला सारून भाजपसोबत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने अभद्र युती केल्याचा आरोप कॉंग्रेसवर केला होता. आता खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेस देखील भाजपसोबत गेली. त्यामुळे आता ही युती भद्र, की अभद्र अशी टिका होत आहे.मात्र या युतीमुळे भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यामध्ये नाराजी असून बहुमत असताना ऱाष्ट्रवादीच्या मदतीची गरजच काय अशा सूर उमटत होता.नेत्यांच्या चेहर्यावर आनंद मात्र कार्यकर्त्यांच्या चेहर्यावर नाराजी स्पष्ट दिसून येत होती.

blank