
पवनी-तालुक्यातील बेटाळा येथे रेती तस्करांनी उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यावर हल्ला करून मारहाण केली होती. याप्रकरणी आतापर्यंत फरार असलेल्या आरोपींमधील इलियाज उर्फ बंटी शेख याला पवनी पोलिसांनी अटक केली आहे. बंटी शेख हा या प्रकरणातील मोठा मासा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पवनी तालुक्यात रेती तस्करांनी धुमाकूळ घातला असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड हे अवैध रेती घेऊन जाणार्या टिप्परवर कारवाई करण्यासाठी बेटाळा येथे गेले होते. दरम्यान, रेतीतस्करांसोबत बाचाबाची होऊन राठोड यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. सुरक्षेसाठी तैनात सहायक पोलिस निरीक्षक राऊत यांनाही मारहाण झाल्याने त्यांना वैद्यकीय रजेवर बळजबरीने पाठविण्यात आले. रेतीमाफियांच्या उचापती असतांना देखील आरोपींना शोधण्यास विलंब होत असल्याने पोलिस विभाग संशयाच्या भोवर्यात आले आहे. तरीसुद्धा पोलिसांनी इलियाज उर्फ बंटी शेख या मोठय़ा रेती तस्कराला पकडून आरोपी शोधण्याच्या कार्यसिद्धीकडे यशस्वी वाटचाल चालविल्याचे समजते.
तथापि, उपविभागीय अधिकार्यांवर हल्ला केल्यानंतरही जिल्ह्यात रेतीतस्करांचा प्रकार सुरूच असून, त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यास जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तोडके पडत आहेत.
मटण पार्टीतील ती व्यक्ती कोण?
उपविभागीय अधिकारी यांना वाळूमाफियाकडून वाळूचे टिप्पर थांबविले म्हणून मारहाण करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींसोबत तीन पोलिस व एक होमगार्ड मटनवर ताव मारतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध झाला. या व्हिडिओमध्ये अगदी आरोपीच्या बाजूला जेवण करतांना दिसत असलेला तो व्यक्ती कोण? त्याचा या प्रकरणाशी संबंध काय? तो या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार तर नाही ना? असे अनेक प्रश्न अनुरात्तीत असून, तालुक्यातील सर्वात मोठा वाळुमाफियामध्ये दिसणारा व्यक्तीच असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.





