35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ ज्ञानाची भूक नसणारा शेतकरी अज्ञानी : आ.मनोहर चंद्रिकापुरे

ज्ञानाची भूक नसणारा शेतकरी अज्ञानी : आ.मनोहर चंद्रिकापुरे

0
37

blank

अर्जुनी-मोरगाव : पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकरी राबराब राबतो. मात्र उत्पन्न आणि खर्चाचे गणित करीत नाही. शेतकऱ्याला व्यापारी होता आले नाही. स्वातंत्र्या नंतरच्या काळात सरकारने याकडे दुर्लक्ष केले. व्यापारी मोठे झाले, शेतकरी आहे तिथेच आहे. जो जोखीम पत्करतो तो नफा कमावतो. यावर्षी टरबूज पीक घेणारे श्रीमंत झाले. आम्हाला धानाच्या मानसिकत्तेतून बाहेर पडून पीकबदल करित नफ्याच्या शेतीकडे वळावे लागेल. जो शेतकरी अफाट कष्ट करतो तो शेतकऱ्यांच्या हिताच्या फायदेशीर मार्गदर्शन मेळाव्यात तासभर बसू शकत नाही, ही शोकांतिका आहे. शेतकरी मेळावा यातून शेतकरी हिताचे ज्ञान मिळते. ज्ञानाची भूक नसणारा शेतकरी अज्ञानी होईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. शेतकऱ्यांनी कृषी मार्गदर्शन शिबिरांमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन आ.मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.

ते स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डमध्ये शेतकरी मेळावा आणि उत्कृष्ट शेतकऱ्यांच्या सत्कार समारंभाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.सेंट्रल बँकेचे माजी संचालक प्रमोद लांजेवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, कृषी तज्ञ डॉ.सी.आर. श्यामकुवर, रंगनाथ कटरे, उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश वावधरे, उपविभागीय अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, शास्त्रज्ञ अनिल पाटील, नागपूर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य देवानंद पंचभाई, नगराध्यक्षा मंजूषा बारसागडे, उपसभापती सविता कोडापे, उपसभापती होमराज पुस्तोडे, ताकृअ रवींद्र लांजेवार, नगर सेविका शीला उईके, कृउबास प्रशासक गिरीश पालीवाल, बंसिधर लंजे, बीडीओ निमजे उपस्थित होते.

चंद्रिकापुरे म्हणाले, माझ्या भागातील शेतकरी संपन्न होण्यासाठी या भागात उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठेची गरज आहे. प्रत्येक शेतकरी हा ग्राहक झाला पाहिजे, असे प्रतिपादन केले.मेळाव्याला डॉ.श्याम कुवर यांनी धान पिकावर, डॉ.रवींद्र भोसले यांनी पीक बदलावर मार्गदर्शन केले. या भागातील मोहा पिकावर आधारित वायनरी प्रोजेक्ट उभारण्याची माहिती दिली. कटरे यांनी राष्ट्रीय कृषी बाजारपेठ योजनेबद्दल माहिती दिली. प्रत्येकाने इनाम अंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी तालुक्यातील उत्कृष्ट शेतकऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासक लोकपाल गहाणे यांनी मांडले. संचालन प्रशासक उद्धव मेहेंदळे यांनी केले. आभार सचिव संजय सिंगनजुडे यांनी मानले.

blank