गोंदिया,दि.27- नगर पालिकेतील गैर कारभार हा नविन विषय नाही. पैशाशिवाय पत्ताही हलत नाही, अशी स्थिती. त्यातच आज (ता.२६) बाजार विभागातील निरीक्षक व सेवानवृत्त कर्मचार्याला ४0 हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत विभागाने जाळ्यात अडकविले. ही सापळा कारवाई आज पालिकेत करण्यात आली. मुकेश राजेंद्रप्रसाद मिश्रा (४0) व टिकाराम गुजोबा मेश्राम (६0) असे लाचखोर कर्मचार्यांचे नाव आहे.
सविस्तर असे की, तक्रारदार यांना गंज बाजार गोंदिया येथील नगर परिषदेच्या मालकीचे दुकान आधीचे दुकानचालकाला चालविण्यास देऊन नगरपरिषद रेकॉर्डवर तक्रारदाराचे मुलाचे नावे करण्याकरिता नोटरी करून दिले. यावरून सदर दुकान नगर परिषद रेकॉर्डवर तक्रारदाराचे मुलाचे नावे करण्याकरिता आरोपी मुकेश राजेंद्रप्रसाद मिश्रा यांनी पंचासमक्ष नगर परिषद मुख्याधिकारी यांना या कामाकरिता ३0 हजार रुपये व स्वत:करीता १0 हजार रुपये दिल्याशिवाय मी तुमचे काम करणार नाही, असे सांगून ४0 हजार रुपए लाचेची मागणी केली. तसेच सदर लाच सेवानवृत्त कर्मचारी टिकाराम मेश्राम यांच्याकडे देण्यास सांगितले. लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली. या प्रकरणाची शहनिशा करून (ता.२६) सापळा कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पंचासमक्ष लाच स्विकारताना आरोपी टिकाराम मेश्राम याला रंगेहात पकडण्यात आले. तर मुकेश राजेंद्रप्रसाद मिश्रा यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, पोनि. अतुल तावडे, पो.हवा. मिलकीराम पटले, नापोशी संतोष शेंडे, राजेंद्र बिसेन, मंगेश काहालकर, संतोष बोपचे, दिपक बतबर्वे यांनी केली.