चंद्रपूर- जिल्हा महिला काँग्रेस (ग्रामीण) च्या जिल्हाध्यक्षपदी नम्रता आचार्य- ठेमस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला काँग्रेसच्या प्रदेश प्रभारी मंत्री ममता भूपेश आणि प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी या नियुक्तीची यादी शनिवारी काढली.
काँग्रेस पक्ष हा महिलांचा सन्मान करणारा आहे. महिलाच्या अधिकारासाठी पक्षाने नेहमीच भूमिका घेतली आहे. नम्रता आचार्य यांनी महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव म्हणून काम करताना जिल्ह्यात त्यांनी अनेक अभिनव आंदोलने केली. कोरोना काळातही त्यांनी ‘एक घास मदतीचा’ हा उपक्रम संपूर्ण राज्यात सर्वाधिक दिवस चालवला. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात पूर आला तेव्हा त्यांनी मदतीचा एक हात हा उपक्रम राबवून सर्वाधिक मदत चंद्रपूर जिल्ह्यातून पाठवली होती. त्याचप्रमाणे ‘रसोई की बात’, ‘राखी महोत्सव’ या सारखे उपक्रम राबवून सामन्य लोकांशी महागाई वर चर्चा आयोजित केल्या. त्यामुळे अल्पवाधीतच त्यांना जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त झाला. अजूनही त्यांचा शासकीय रुग्णालयात मदत व सल्ला केंद्र हा उपक्रम सुरूच आहे. याची दखल पक्ष श्रेष्ठींनी घेऊन त्यांना महिला काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.