नाशिक,दि.31ः- भगवान हनुमानाचे जन्मस्थळ कोणते, यावरून नाशिकमध्ये साधू, महंत आणि संतामध्ये शास्त्रार्थ चर्चा आणि त्यानंतर जोरदार वाद-विवाद झाला. दोन्ही पक्ष आपापल्या बाजूवर ठाम असून, कोणीही माघार घ्यायला तयार नसल्याने अखेर ही धर्मसभा स्थगित करण्यात आली.
भगवान हनुमानाचे जन्मस्थान हे नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी नसून, कर्नाटकमधील किष्किंधा असल्याचा दावा स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी केला, त्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह देशात साधू, संतामध्ये नवा वाद सुरू झाला असून आज नाशिकच्या महंतांनी शंकराचार्य यांना काॅंग्रेसी म्हटल्यानंतर वाद उभा राहीला, त्यानंतर गोविंदानंदांवरही त्यांनी हातही उगारला त्यानंतर गोविंदानंदानीही शंकराचार्यांची माफी मागावी अशी आग्रही भूमिका घेत आपला संतापही व्यक्त केला. त्यानंतर उभय धर्ममार्तंडांची सभा स्थगित करण्यात आली.
सिंहासनावर बसले अन्…
गोविंदानंद यांच्या या दाव्यानंतर नाशिक आणि त्रंबकेश्वर येथील काळाराम मंदिराचे पुजारी सुधीर दास, अनिकेत शास्त्री देशपांडे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, सनातन वैदिक धर्म सभाध्यक्ष भालचंद्र शाउचे, नविनगिरी महाराज, भक्तीचरण दास, देवांग जानी यांनी या चर्चांमध्ये सहभाग घेतला. सुरुवातीला गोविंदनंद हे सिंहासनावर बसले होते. तेव्हा त्यांना विरोध करणाऱ्या साधू, संतांनी समान आसनावर बसण्याची मागणी केली. त्यावरून वाद सुरू झाला. या घटनेवरून नाराज झालेले नाशिक जिल्ह्यातील साधू निघून गेले.

गोविंदानंदांचे आव्हान…
गोविंदानंद यांनी हाताची चुटकी वाजवीत तुम्ही हनुमान जन्मस्थानाचा ग्रंथातील पुरावा द्या, अन्यथा भगवे कपडे परिधान करण्याचे सोडून द्या, असे आव्हान केले. या आव्हानाला उत्तर देण्यासाठी हनुमान जन्मस्थानावरून वादविवाद झाला. उशिरापर्यंत यावर अंतिम निर्णय झाला नाही. स्वामी गोविंदानंद देखील माघार घेत नसल्याने वाद सुरूच होता.
धर्मसभेपूर्वी उडाला गोंधळ
हनुमान जन्मस्थळाच्या वादावरून नाशिकमध्ये धर्मसभा सुरू होण्यापूर्वीच मोठा गोंधळ उडाला. कर्नाटकातील किष्किंदात हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा करणाऱ्या स्वामी गोविंदानंद सरस्वती यांच्यासमोर आम्ही खाली बसणार नाही, असा पवित्रा इतर साधू, महंतांनी घेतला आहे. बैठकीत स्वामी गोविंदानंद हे वरच्या आसनावर जाऊन बसले. त्यामुळे नाशिकमधील इतर साधू आणि महंत यांच्या संतापाचा पारा चढला. त्यामुळे या धर्मसभेपूर्वीच वादाचा भडका उडाला.
दरम्यान, मोठया वादानंतर धर्मसभा सुरु झाली आहे. गोविंदानंद यांच्यासह सर्व महंत खाली बसले आहेत. हनुमान जन्मस्थळावरुन सध्या वाद, प्रतिवाद सुरु असून स्वामी गोविंदानंद, पिनाकेश्वर, भक्ती चरणदास, महंत सुधीरदास, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, उमेश महाराज, देवांग जानी, भानुदास शौचे आदी उपस्थित आहेत.
साधू, महंत म्हणतात…
गोविंदानंद हे शंकराचार्य किंवा मोठे विद्वान नाहीत, त्यांच्यासमोर आम्ही खाली बसणार नाही, असा आक्षेप भक्ती चरणदास, महंत सुधीरदास यांनी घेतला आहे. सर्वांसाठी समान आसन व्यवस्था करावी, अन्यथा धर्मसभेवर बहिष्कार घालण्याचा इशाराही साधू, महंतानी दिला आहे. वाल्मिकी रामायणानुसार हनुमानाचा जन्म अंजनेरीत नाही, तर कर्नाटकातील किष्किंदात झाल्याचा दावा स्वामी गाेविंदानंद सरस्वती यांनी केला आहे. या मुद्द्यावर गोविंदानंद यांनी नाशिकच्या धर्म पंडितांना शास्त्राेक्त सभेचे आव्हान दिले आहे. त्यानुसार आज नाशिकराेड येथील महर्षी पंचायतन सिद्धपीठ येथे धर्मसभा हाेत आहे. यात देशभरातील साधू, महंत सहभागी हाेणार आहेत. दावे-प्रतिदाव्यांमुळे ही धर्मसभा वादळी हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गोविंदानंदांचे आव्हान
स्वामी गोविंदानंद म्हणाले की, आसनाचा वाद नाही. शास्त्रात ताकद नसल्याने साधू, महतांनी वाद घातला. त्याच्याकडे कोणतेही प्रमाण नाही. माझ्याकडे शास्त्रप्रमाण आहे. त्याने दूध का दुध पाणी का पाणी करू. मी खाली बसतोय. साधू, महंत यांच्यात ताकद असेल, तर सिद्ध करून दाखवावे. अन्यथा हार मानून भगवे वस्त्र सोडावे, असे खुले आव्हान त्यांनी दिले आहे.

नाशकात कलम 144 लागू
आजच्या धर्मसभेत हनुमान जन्मस्थळाबाबतचे विविध पुरावे दाखले सादर केले जाणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हनुमान जन्मस्थळाच्या वादावर धर्मसभेत नेमका काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून नाशिक पोलिसांनी शहरात कलम 144 लागू केले आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
धर्मसभेवर आक्षेप
दरम्यान, या धर्मसभेबाबत नाशिक, त्र्यंबकेश्वर येथील साधू, महंतांसह अंजनेरीच्या ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. हनुमान जन्मस्थळाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करुन गोविंदानंद यांनी उगीचच वाद निर्माण केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काल नाशिकमध्ये गोविंदानंद यांची रथयात्राही काढण्यात येणार होती. मात्र, त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे निघणारा त्यांचा रथ रोखण्यासाठी अंजनेरी येथे साधुमहंतांसह ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे त्र्यंबकेश्वर मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अखेर पोलिसांनी गोविंदानंद यांचा रथ बंदोबस्तात नाशिककडे रवाना केला. मात्र, रथयात्रेमुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने नाशकात गोविंदानंदांच्या मिरवणुकीस पोलिसांनी परवानगी नाकारली.

वादातून आंदोलन चुकीचे : भुजबळ
देशासह राज्यात अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांनाही वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. असे असताना कुणातरी एकाच्या सांगण्यावरून जन्मस्थळाच्या मुद्द्यावरून वाद करून आंदोलन करणे चुकीचे असल्याचे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की अंजनेरी येथील जन्मस्थळाबाबत महाराष्ट्र सरकारचे किंवा न्यायालयाचेही काहीही म्हणणे नाही मग हे आंदोलन कशासाठी? कोणी तरी एखादा व्यक्ती येतो व यावरून वाद निर्माण करतो, हे चुकीचे आहे. या आंदोलनामुळे आपल्या मुलांचे, शेतकऱ्यांचे नुकसान होईल. त्यामुळे कुणीही आंदोलन करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.