पैगंबरांवरील टिप्पणीवर भाजपची कारवाई:प्रवक्त्या नुपूर शर्मांची पक्षातून हकालपट्टी

0
10

भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. नुपूर यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. भाजप सर्वच धर्म व त्यांच्या प्रतीकांचा सन्मान करत असल्याचे या प्रकरणी स्पष्ट करण्यात आले आहे.

भाजपने नुपूर शर्मांसह दिल्ली प्रदेश प्रवक्ते नवीन जिंदल यांच्यावरही कारवाई केली आहे. त्यांनाही पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. जिंदल यांनी नुपूर यांच्या विधानाच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. जिंदल यांनी आपल्या विधानाचा उद्देश कोणत्याही समुदायाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता असे स्पष्ट केले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी या कारवाईचे निवेदन जारी केले आहे.

देशाचे अखंडत्व व विकासाला प्राधान्य -भाजप

भाजपने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी एक भारत, श्रेष्ठ भारताची भावना मजबूत होत आहे. आमचे पहिले प्राधान्य अखंड भारत व विकासाला आहे. देशाचे ऐक्य अबाधित रहावे यासाठी आमचा प्रयत्न आहे.

भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात प्रत्येक धर्माचा प्रचार प्रसार झाला आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माविरोधात केल्या जाणाऱ्या अवमानास्पद विधानाचा आम्ही निषेध करतो. भाजपचा कोणत्याही धर्माचा अवमान करणाऱ्या विचारधारेला विरोध आहे. आम्ही अशा कोणत्याही विचारधारेचा प्रचार करत नाही, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांकडे केली होती बलात्काराची धमकी मिळाल्याची तक्रार

प्रेषित पैगंबर यांच्याविषयीच्या वादग्रस्त विधानानंतर नुपूर शर्मा यांना सोशल मीडियावर बलात्कार व हत्येची धमकी मिळाली होती. त्यांनी दिल्ली पोलिसांकडे त्याची तक्रार केली होती. दुसरीकडे, त्यांच्या विधानानंतर कानपुरात मोठी दंगल उसळली होती. येथील मुस्लिम संघटनांनी त्यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला होता.

बुंदीचे मौलाना म्हणाले – हात पाय तोडा
नुपूर शर्मा यांच्या विधानानंतर राजस्थानच्या बुंदीचे मौलाना मुफ्ती नदीम यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्यांचे हात-पाय तोडण्याची धमकी दिली आहे.