वाशिम, दि. 06 : शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया दहावीचा निकाल लागण्यापूर्वी 2 जून 2022 पासून सुरु झाली आहे. यामध्ये प्रथम वर्षाकरीता दहावी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी https://poly22.dte.maharashtra.gov.in/diploma22 या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करु शकतात. पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रीयेच्या अनुषंगाने जिल्हयातील सुविधा केंद्राना येणाऱ्या अडचणीचे निवारण करण्यासाठी संस्थेचे प्राचार्य डॉ. बी.जी. गवलवाड यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रीयेच्या सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये विद्यार्थी कॉम्प्युटर किंवा अँड्रॉईड मोबाईलव्दारे नोंदणी करु शकतात. नोंदणी केल्यानंतर कागदपत्रे पडताळणीसाठी ई-स्क्रुटीनी आणि प्रत्यक्ष स्क्रुटीनी असे दोन पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. पहिल्या पर्यायांमध्ये ज्या विद्यार्थ्याकडे कॉम्प्युटर, इंटरनेट किंवा अँड्रॉईड मोबाईल आदी सुविधा आहेत असे विद्यार्थी घरी फॉर्म भरुन आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन त्यांना कागदपत्रे पडताळणीसाठी एफ सी सेंटरला जाण्याची गरज नाही. ज्या विद्यार्थ्याकडे सदर सुविधा उपलब्ध नाही असे विद्यार्थी एफ सी सेंटरला फॉर्म भरुन उपलब्ध असलेल्या टाईम्स लॉटमध्ये कागदपत्रे पडताळणीसाठी येऊ शकतात.
शासकीय तंत्रनिकेतन वाशिम येथे समुपदेशन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रीया, विविध शाखांची माहिती व प्रवेश प्रक्रीयेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तसेच संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांबद्दल मार्गदर्शन केल्या जाणार आहे. शासकीय तंत्रनिकेतन वाशिम येथे सुविधा केंद्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी डॉ. आर.जी. बिलोलीकर 8421083110 आणि एस.एम. शेळके 9922897164 यांच्याशी संपर्क करावा. तरी दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनी या पदविका अभ्यासक्रमासाठी नोंदणी करुन या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन वाशिमचे प्राचार्य डॉ. बी.जी. गवलवाड यांनी केले आहे.