
वाशिम, दि. 06 : जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने काटेपुर्णा अभयारण्य येथे 5 जून रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे आयोजन मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीमती जयोती बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक वनीकरण विभाग अमरावतीचे वनसंरक्षक डी. पी. निकम, अकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, वन्यजीव विभाग गुगामलचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, बुलडाणा प्रादेशिक विभागाचे उपवनसंरक्षक श्री. के. अर्जुना व अकोला वन्यजीव विभागाचे अक्षय गजभिये यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या “ओन्ली वन अर्थ” या विषयाअंतर्गत विविध मान्यवरांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. सोबत काटेपुर्णा अभयारण्याचे माहिती फलक व पोस्टरचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पहिले सत्र सामाजिक वनीकरणाचे वनसंरक्षक डी. पी. निकम यांनी निसर्ग चक्र व मानवांनी केलेली त्याची हानी व उपाययोजना या विषयावर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. बुलडाणाचे उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांनी अस्वल यांच्यासोबत होत असलेल्या मानव-प्राणी संघर्ष व उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती दिली. भारतीय वन्यजीव संस्थानचे संशोधक जयदीप पाटील यांनी प्रकल्पातील वाघाचे होत असलेले स्थलांतर याविषयी महत्वपूर्ण अनुभव सादरीकरणाद्वारे मांडले.
अकोला येथील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचे प्रा.डॉ. मिलिंद शिरभाते यांनी लोकसहभागातून पर्यावरण संवर्धन व संरक्षण या संदर्भात माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव यांनी काटेपूर्णा अभयारण्यांचे व्यवस्थापन याविषयी सादरीकरण केले. तर मेळघाट व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानचे उपजीविका तज्ञ प्रफुल्ल सावरकर यांनी लोणार वन्यजीव अभयारण्याची ओळख याविषयी सादरीकरणातून माहिती दिली. अकोला वन्यजीव, अकोला प्रादेशिक व सामाजिक तसेच बुलडाणा प्रादेशिक विभागातील वने व वन्यजीव संवर्धन व संरक्षण संदर्भात उत्कृष्ट कार्य केलेल्या वन अधिकारी, वन कर्मचारी, वनमजूर तसेच इको गाईड व या क्षेत्रात कार्यरत व उत्तम कार्य करणाऱ्या अशासकीय संस्था अकोला येथील निसर्गकट्टा संस्था व साळूकांबाई राऊत महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
अध्यक्षीय मार्गदर्शनातून श्रीमती. जयोती बॅनर्जी यांनी सर्व सन्मान प्राप्त वन कर्मचारी यांचे अभिनंदन केले. पर्यावरण संवर्धन व संरक्षण हे आपल्यासोबत सर्व समाजाचे कार्य आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी, गावकरी यांचा समावेश राहील तेंव्हाच शाश्वत पर्यावरण राखले जाईल असे मनोगत व्यक्त केले. जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याची जबाबदारी काटेपुर्णा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव आणि त्यांच्या चमूने अथक परिश्रम घेऊन पार पाडली. मेळघाट व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानचे स्वप्रील बांगडे व अमरावतीचे मेळघाट व्याघ्र प्रकल्प वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश तापस, ज्ञानगंगा अभयारण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी श्री. लोखंडे यांनीही सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रफुल्ल सावरकर यांनी केले.