
तिरोडा(गोंदिया),दि.15-गोंदिया-धापेवाडा -तिरोडा राज्यमार्गावर दवनीवाडा पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या महालगाव/मुरदाडा गावाजवळ आज 15 जून रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास झालेल्या ट्रक ट्रक्टरच्या या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले.मृतकाचे नाव प्रशांत धर्मराज आगासे (वय 28) रा. महालगाव असे आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी रेती भरलेला अख्खा टिप्पर जाळून टाकला. गंभीर जखमींना गोंदिया येथे उपचारासाठी नेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत 5 जण जखमी असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालय गोंदिया येथे नेले आहे. त्यात 3 गंभीररित्या जखमी व 2 जण किरकोळ जखमी आहेत. जखमींमध्ये गोविंद धर्मराज आगाशे (वय 35), विशाल मुन्नालाल नागपुरे (वय 22), गुलशन बळीराम कावळे (वय 19), उमेश शंकर आगाशे (वय 18) व शैलेश मुलचंद भोयर (वय 22) यांचा समावेश आहे.
घटनेची माहिती होताच नागरिकांनी एकच धाव घटनास्थळाकडे घेत आक्रोश व्यक्त केला.या मार्गावरुन दररोज शेकडोच्या संख्येने टिप्पर,ट्रक व ट्रक्टर हे रेतीची वाहतूक करताता.यामध्ये आधी कोण जाणार याची स्पर्धा लागलेली असते त्यामुळे ही वाहने अधिक वेगाने नेहमीच धावत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.त्यातच सदर रस्ता सुध्दा या वाहनामुळे खराब झालेला आहे.या घटनेने गावात शोककळा पसरली असून दवनीवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. गावकरी महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाविरुद्ध मोठा रोष व्यक्त करीत असल्याचे दिसून येत आहे. दवनीवाडा पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सुरू आहे. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावला आहे. या घटनेमुळे गोंदिया-धापेवाडा मार्गावरील वाहतूक काही तास बंद राहिली.