हत्याप्रकरणी तीनही आरोपी अटकेत

0
56

चंद्रपूर-शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक ज्युबिली हायस्कूलच्या परिसरात मात्र मागील भागात असलेल्या जटपुरा गेट ते रामाळा तलाव मार्गावरील शिक्षण भवनाच्या जुन्या पडक्या इमारतीच्या छतावर एका ३0 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला होता. रात्री ९ वाजताच्या दरम्यान पोलिस नियंत्रण कक्षाला ह्या संदर्भात माहिती मिळताच चंद्रपूर शहर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता तिथे हात पाय चिकटपट्टी बांधून मारहाण करून हत्या केलेल्या युवकाचे शव आढळून आले. घटनास्थळी सर्वत्र दारूच्या बाटल्या विखुरलेल्या होत्या तसेच त्या युवकाला बांधून दारूची बाटली डोक्यावर फोडून त्याची हत्या करण्यात असल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत होते. मात्र ही हत्या करणार्‍यांनी कुठलाही पुरावा सोडला नव्हता. जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी चंद्रपूर पोलिस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेला मृतकाची ओळख पटविणे व हत्येचे कारण शोधून मारेकर्‍यांना हुडकून काढण्याचे कठीण काम सोपविले. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासांच्या आत प्रकरणाचा छडा लावून ३ आरोपींना जेरबंद केले असून, त्यांच्यावर पो.स्टे. चंद्रपूर शहर येथे अप. क्र. ३२७ / २0२२ कलम ३0२, २0१ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे व सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे यांचे दोन पथक तयार तपास सुरू केला. मृतकाचे नाव राहुल विलास ठक असून तो भारतीय स्टेट बँकेच्या समोर, पेठ वॉर्ड राजुरा येथील रहिवासी होता. तो चंद्रपूर येथे डॉ. चिल्लरवार यांच्याकडे वाहन चालक म्हणून काम करीत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने हत्येचे कारण व मारेकरी कोण, याकडे आपले लक्ष वळविले. पोलिसांना प्राप्त माहितीनुसार अंदाजे १ वर्षापूर्वी त्याचे एका स्त्रीसोबत मोबाईलवर काहीतरी मॅसेज केले होते. त्यावरून वाद झाला होता व त्या स्त्रीच्या दोन मुलांनी राहुल यास मारहाण केल्याची माहिती प्राप्त झाली. गुन्हे शाखेच्या पथकाने त्या महिलेचा शोध घेऊन चौकशी केली असता त्यांचा लहान मुलगा घरी होता तर मोठा मुलगा हा नाशिक येथील एमआयडीसीमध्ये कामाला असून पत्नीसह नाशिक येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यावरून मुलगा वैभव राजेश डोंगरे हा मागील तीन दिवसांपासून नाशिकवरून चंद्रपूरला आल्याची माहिती मिळाली. यावरून गुन्हे शाखेने चंद्रपूर येथील त्याच्या मित्रांची माहिती घेतली असता संदीप ऊर्फ गुड्डू राजकुमार बलेवार (वय ३0) रा. इंदिरानगर चंद्रपूर याचे नाव समोर आले. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तो कोणतेही समाधानकारक उत्तरे देत नव्हता. दरम्यान, गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, संशयित वैभव डोंगरे हा एका साथीदारासह नाशिकला जाणार आहे. यावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. वैभव डोंगरे व त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र कार्तिक रमेश बावणे (वय २५) रा. आंबेडकर चौक सिंदेवाही याला विचारपूस केली असता वैभवने सांगितले की, त्याचे मृतक राहुल याच्याशी एक वर्षाआधी झालेल्या वादाचा बदला घेण्याच्या उद्देशाने त्याने संदीप ऊर्फ गुड्डू राजकुमार बलेंवार (वय ३0) रा. इंदिरानगर, चंद्रपूर व कार्तिक रमेश बावणे (वय २५) रा. आंबेडकर चौक सिंदेवाही यांचे मदतीने दारू पाजून, त्याचा गळा आवळून व डोक्यावर दारूच्या काचेचे बॉटलने वार करून जीवानीशी ठार मारले. सदर गुन्ह्य़ात तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई प्रभारी पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, शेखर देशमुख, प्रभारी अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, स. फौ राजेंद्र खनके, पोहवा. स्वामी चालेकर, संजय आतंकुलवार, नितीन साळवे, सुरेंद्र मोहतो, ना. पो. कॉ. सुभाष गोहोकार, चंदू नागरे, संतोष येलपूलवार आदींनी केली आहे.