गोंदिया,दि.17ःपाऊस लांबणीवर गेल्याने पेरणीबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. असे असतानाच दुसरीकडे कृषी सेवा केंद्राकडून बोगस बी-बियाणे आणि खत विक्रीचे प्रमाण वाढले आहे.आतापर्यंत बीड, अकोला, लातूर जिल्ह्यामध्ये कृषी विभागाकडून अशा कृषी सेवा केंद्रावर कारवाया करण्यात आल्या आहेत. आता भंडाऱ्यात तर कृषी विभागाच्या कारवाईने चांगलेच धाबे दणाणले आहे. जिल्ह्यात 16 कंपन्याच्या बियाणे विक्रीस आणि 2 कंपन्यांच्या खत विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. परवान्यात समावेश नसलेल्या 8 कृषी सेवा केंद्रावर ही कारवाई करण्यात आली असून आता वेगवेगळ्या 16 कंपन्याचे बियाणे विक्री करता येणार नाहीत. हंगामाच्या सुरवातीलाच ही कारवाई झाल्याने शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टळले आहे.
विना परवान्याचेच बियाणे विक्री
बियाणे विक्रीसाठी आवश्यकता आहे ती कृषी विभागाच्या परवान्याची. असे असताना देखील विनापरवान्याचे बियाणे आणि खते जिल्ह्यातील 8 कृषी सेवा केंद्रामध्ये विक्रीस ठेवण्यात आले होते. त्याच बरोबर दोन कंपन्याच्या खत विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. विक्रीसाठा ठेवण्यात येणाऱ्या बियाणांसाठी आणि खतांसाठी परवाना असणे गरजेचे आहे. असे असताना देखील बियाणे आणि खताची विक्री म्हणजे शेतकऱ्याची फसवणूक आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.
👉या कृषी सेवा केंद्रावर कारवाई
परवान्यात समावेश नसलेल्या करडी येथील कावळे कृषी केंद्र, डोरले कृषी केंद्र, पालोरा येथील पितृछाया कृषी केंद्र, हरदोली येथील दीपाली ॲग्रो एजन्सी, कृपा कृषी केंद्र, माऊली कृषी केंद्र, खमारी बुटी येथील शारदा ॲग्रो ट्रेडर्स यांचा समावेश आहे. या कृषी केंद्रांनी परवानाधारक बियाणे आणि खते विक्रीस ठेवली नव्हती. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला असता म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.
👉लाखो रुपये खत, बियाणांचा समावेश
भंडारा जिल्ह्यातील 8 कृषी केंद्रामध्ये 16 कंपन्यांचे 9 लाख 90 हजार रुपयांचे बियाणे विक्रीस ठेवण्यास आले होते. त्यामुळे आता 94 क्विंटल बियाणांची विक्री ही करता येणार नाही. तर महाराष्ट्र फर्टिलायझर एन्ड केमिकल व इफको या कंपन्यांचा समावेश परवान्यात न केल्यामुळे माऊली कृषी केंद्र हरदोली येथील 11.34 लाख किंमतीचे 49.75 मे. टन खतात विक्री बंदी आदेश दिले आहेत.