भारतीय संविधानामुळेच देशात राष्ट्रवादाची संकल्पना रुजली -ऍड सीमा कुशवाह

0
19

रजेगावात छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात

गोंदिया ता.27:- नागपूरचा राष्ट्रीय स्वयं सेवक संघ हा राष्ट्रवाद निर्माण करण्याच्या निव्वळ बढाया मारतो,पण भारत देशात राष्ट्रवादाची संकल्पना भारतीय राज्य घटनेने रुजविली आहे,अशी ग्वाही, सर्वोच्च न्यायालयाच्या वकील सीमा समृद्धी कुशवाह यांनी(ता.26) दिली.
रजेगाव येथे आयोजित छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीदिनी त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूरचे उपायुक्त धंनंजय वंजारी हे होते. मंचावर ऍड स्वयं आंबेडकर, शिक्षणाधिकारी गजभिये, श्रीमती सविता बेदरकर, जिल्हा संख्यिकी अधिकारी श्री राऊत, जिल्हा सहकार निबंधक शुददोधन कांबळे,आदि मान्यवर उपस्थित होते.
ऍड कुशवाह पुढे बोलताना म्हणाल्या की,भारतीय संविधानाने व्यक्तीचे मानवीय मूल्य जोपासले आहे. जी प्रस्थापित समाज व्यवस्था बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करते, तो कसला राष्ट्रवाद आहे असा प्रश्न त्यांनी केला. राष्ट्रसंघाच्या यादीत भारत अत्यंत खालच्या क्रमांकावर आहे. बहुजन समाज शिक्षनापासून वंचित आहे. येथील प्रसार माध्यम मनुवाद्यांचे बाहुले बनले आहेत. परिणामी आम्ही अधिकार वंचित झालो आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देशातील समाजव्यवस्थेची जाणीव होती, ते संविधान लिहिण्यास सक्षम आहेत याची जाणीव भारतीय पुढाऱ्यांना होती म्हणूनच त्यांनी बाबासाहेबांना संविधान लिहिण्यासाठी विनंती केली असे त्या म्हणाल्या.ज्यांनी आम्हाला शूद्र म्हणून आमच्याशी भेदाभेद केले त्यांनी आमची माफी मागावी. लोकसंख्याने तीन टक्के असणाऱ्या समाजाच्या महिलांनी कधीही शिक्षण मिळण्यासाठी आंदोलन केलं नाही पण त्या शिक्षित आहेत. आमचा अधिकार हिसकावू पाहणाऱ्यांना आमचा अधिकार हिसकावू देणार नाही, परंतु आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आम्हाला लढाई लढावी लागेल याची जाणीव आपण ठेवावी.ऍड कुशवाह म्हणाल्या की आमच्या प्रत्येकाकडे असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळे आम्ही खूप मोठी क्रांती करू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी कांशीराम साहेबांचे उदाहरण देऊन सांगितलं की वैक्तिक हित बाजूला सारून
समाजहीत जोपासल्यामुळे सरकार निर्माण करता येतं, परंतु आम्ही विखूरल्या अवस्थेत असल्यामुळे आम्ही सत्तेपासून वंचित आहोत यावर त्यांनी दुःख व्यक्त केलं. तुम्हा सर्वांच्या एकजुटीमुळेच आणि आंदोलनामुळेच एससी एसटी ऍक्ट शक्तिशाली झाला असे त्यांनी सांगितले. महिलांना संबोधित करताना ऍड कुशवाह यांनी सांगितलं की मंगळसूत्र, जोडवे, आणि पायातील पैंजण हे सगळेच महिलांच्या बेड्या आहेत म्हणून महिलांनी शिक्षण घ्यावे असे आवाहन त्यांनी केलं. त्यांनी खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याची जोरदार मागणी केली.यावेळी ऍड स्वयं आंबेडकर, उपायुक्त वंजारी, सविता बेदरकर आणि ओबीसी संघटनेचे श्री कटरे यांनी मार्गदर्शन केलं.हा कार्यक्रम फुले, शाहू, बिरसा, आंबेडकर विचारमंचाच्या विद्यमाने आयोजित करण्यात आला.
सडक अर्जुनी तालुक्यातील जांभळी येथील रावण डॅन्स ग्रुपने सादर केलेल्या पारंपरिक गोंडी नृत्याने दर्शक मंत्रमुग्ध झाले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, जणनायक बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार रामासामी नायकर, साहेब कांशीराम, राष्ट्रमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या छायाचित्रांना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.छत्रपती शाहू महाराजांची जयंती दिवाळी प्रमाणे करावी अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती ती इच्छापूर्ती करण्याचे काम रजेगाव इथं झाले आहे, अशी चर्चा लोकांमध्ये होती.ऍड कुशवाह यांच्या हस्ते गोंडीनृत्य संचालकांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.बालाघाट येथील प्रकाश सागर यांच्या बोधिसत्व ऑर्केस्ट्राने सादर केलेलं छत्रपती शाहू महाराजांवरील गाणं “आरक्षण के जनक तुम्ही हो, हमारा नमन तुम्हे महाराज” यामुळे महापुरुषांच्या कार्याची महती लोकांना कळाली.कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजेंद्र मेश्राम यांनी तर आभार शिक्षक रामभगत पाचे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमेंद्र डहाट, रक्षित विद्रोही, तसेच गोंदिया, काटी, बिरसोला, बघोली, रजेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.