अण्णाभाऊंच्या साहित्यात परिवर्तन घडविण्याची ताकद

0
16

नागपूर- छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र केवळ देशातच नाही तर जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले. अण्णाभाऊंचे साहित्य शोषित, पीडित, अन्यायग्रस्तांचे साहित्य असून माणसाच्या हृदयाला भिडणारे आहे. मानवामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची ताकद आहे. त्यांचे हे साहित्य केवळ समन्वय, समरसतेचे नसून राष्ट्रवादाचेही आहे. अशा या साहित्याचा उल्लेख मानव इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी केला जाईल, असे मत डॉ. अरविंद देशमुख यांनी व्यक्त केले.
समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्रच्यावतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य व समरसतेवर आधारित १९ व्या समरसता साहित्य संमेलनाचे आयोजन डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले आहे. शनिवारी या संमेलनाच्या उद््घाटनानंतर ‘अण्णाभाऊंच्या साहित्यातील राष्ट्रीयता’ विषयावर परिसंवाद पार पडला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी अभ्यासक व विचारवंत डॉ. अरविंद देशमुख होते.
डॉ. भास्कर म्हरसाळे, डॉ. कोमल ठाकरे, शिवा कांबळे यांचाही यात सहभाग होता. डॉ. देशमुख यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र साहित्याचा आढावा घेतला. डॉ. कोमल ठाकरे यांनी अण्णाभाऊंचे कादंबरीविश्‍व व त्यातील राष्ट्रीय जाणीवांवर विचार मांडले. शिवा कांबळे यांनी अण्णाभाऊंच्या कथा वाड्मयातील राष्ट्रीय सुत्रांचा उलगडा केला तर डॉ. भास्कर म्हरसाळे यांनी अण्णाभाऊंच्या काव्य व शाहिरीमधून कशी राष्ट्रीयता झळकते, याचे प्रत्यक्ष उदाहरण त्यांचे गण व कविता सादर करून र्शोत्यांसमोर ठेवले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते खा. बाबासाहेब साळुंके सामाजिक प्रतिष्ठानच्या ‘आमचं साहेब’ या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. परिसंवादाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गजानन होडे यांनी केले.

अण्णाभाऊंच्या साहित्याचे वस्तुनिष्ठ परीक्षण व्हावे – पद्मश्री डॉ. नामदेव कांबळे
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र साहित्याचा आढावा घेत असताना केवळ त्या साहित्याचे कौतुक करण्यापेक्षा त्याचे वस्तुनिष्ठ परीक्षण करणारी साहित्यिकांची फळी समोर आली पाहिजे तरच खर्‍या अर्थाने अण्णाभाऊंच्या साहित्याला न्याय मिळेल, असे मत पद्मश्री डॉ. नामदेव कांबळे यांनी मांडले. अण्णाभाऊ साठे : समतेचे पथिक या विषयावर परिसंवाद पार पडला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉ. नामदेव कांबळे होते. यात डॉ. धनंजय भिसे, डॉ. अंबादास सकट, डॉ. उज्‍जवला हातागळे व हेमंत चोपडे यांचा सहभाग घेतला. परिसंवादाचे सूत्रसंचालन काशीनाथ पवार यांनी केले.