शेतकरी हीतासाठी 25 गोडाऊन तयार करणार

0
113

जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले यांची घोषणा : जिल्हा परिषदेत कृषी दिन साजरा

गोंदिया, ता. 5 : जिल्हयात धानाच्या शेतीवर भर आहे. धानाच्या शेतीतून कीती प्रगती होते, यावर चिंतन करण्याची गरज व्यक्त करून शेतकऱ्यांनी आता नगदी पिकांच्या उत्पादनवर भर द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केले. दरम्यान शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हयात 25 गोडाऊन आणि ‘कोल्डस्टोरेज’ तयार करण्याचा मानसही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
कै. वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृहात आयोजित कृषी दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, उपाध्यक्ष इंजि. यशवंत गणवीर, कृषी व पशूसंवर्धन समितीचे सभापती सोनू कुथे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जर्नादन खोटरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, कृषी विकास अधिकारी  मडामे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  नरेश भांडारकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी. आर. खामकर यावेळी उपस्थित होते. भल्या पहाटेपासून शेतकरी शेतात जातो, राबराब राबतो. त्याचे दुख;, त्याचे परिश्रम समजण्याची गरज आहे. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांला प्रतिष्ठा आणि शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहीजे. कृषी दिन हा शासकीय कार्यालयात नव्हे; तर शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा करण्यावर भर देत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष  इंजि. यशवंत गणवीर यांनी अधिकार कर्मचाऱ्यांसाठी ‘एक दिवस शेतीसाठी’ हा उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. आपला जिल्हा कृषीप्रधान आहे. जिल्हयात पाणीही मुबलक प्रमाणात आहे. वेगवेळे पीक घेवून आपणास प्रगती साधता येईल. केवळ उत्पादन घेवून शेतकऱ्यांनी थांबू नये, तर उत्पादनाचे मार्केटींग करण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले. वसंतराव नाईक यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. दरम्यान धाबेटेकडी येथील प्रगतीशिल शेतकरी ललित सोनवाने, बोंडगाव/देवी येथील शेतकरी कुसन झोडे, मालकनपूर येथील शेतकरी नितीन पाटणकर यांचा याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
——-
डॉक्टर हे उत्तम समाजसेवक : इंजि. यशवंत गणवीर
आधुनिक काळात व्यक्तींचे आर्युमान वाढले. कोणताही आजार असो, विज्ञानातील प्रगतीने त्यावर मात केलीे. केवळ व्यवसाय म्हणूनच नव्हे; तर उत्तम समाजसेवेचे व्रत म्हणून डॉक्टरांची सेवा अत्यंत महत्वाची असल्याचे मत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंजि. यशवंत गणवीर यांनी व्यक्त केले. दरम्यान डॉक्टर्स दिनानिमीत्त सर्व डॉक्टरांना शुभेच्छा देवून समाजसेवेच्या या व्रतासाठी डॉक्टरांनी अधिक कार्यतत्पर होवून गोरगरीब जनतेपर्यंत सेवा पोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा परिषदेत आयोजित आरोग्य समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे व अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.