
भंडारा-भरधाव ट्रेलरला टिप्परने समोरासमोर जोरदार धडक दिली. इंधन टाकीला धडक लागल्याने स्फोट झाला व क्षणात दोन्ही वाहनांना आग लागली. यात टिप्पर चालक जखमी अवस्थेत वाहनात अडकल्याने आगीत जळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटना आज बुधवारी सकाळी भंडारा-वरठी राज्य महामार्गावरील दाभा शिवारात घडली.
इरफान मोहम्मद असलम शेख (वय २५) रा. फतेहपूर, उत्तरप्रदेश, हल्ली मुक्काम नागपूर असे मृतकाचे नाव आहे. इरफान हा नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी मालवाहतूक वाहन रिकामे करून नागपूरच्या दिशेने जात असताना त्याचे वाहनावरून नियंत्रण सुटले. दरम्यान दाभाजवळील मुख्य मार्गावर समोरून येणार्या ट्रेलरला जोरदार धडक दिली.
यात ट्रेलरच्या इंधन टाकीत स्फोटाचा भडका उडाला व आग लागली. ट्रेलर चालक कसाबसा वाहनातून बाहेर पडला. यावेळी टिप्पर चालक जखमी अवस्थेत वाहनाच्या स्टेरिंगमध्ये अडकल्याने बाहेर पडू शकला नाही. क्षणातच वाहनाला भीषण आगीने वेढा घातला. मदत मिळण्यापूर्वीच त्याचा जळून कोळसा झाला. जवळपास तासभर दोन्ही वाहन पेटत राहिले.
घटनेची माहिती मिळताच वरठीचे पोलिस निरीक्षक निशांत मेर्शाम ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले. तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी, हवालदार संदीप बांते, घनश्याम गोमासे व नितीन भालाधरे यांनी शर्थीचे प्रयत्न केले.




