
गोंदिया,दि.21 : जिल्ह्यात पिकावरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) 1 जुलै 2022 पासून खरीप हंगामाकरीता राबविण्यास सुरुवात झालेली असून 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत भात पिकांचे नियमीत सर्वेक्षण कृषि विभागाच्या सर्व क्षेत्रिय यंत्रणेमार्फत गावोगावी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन करण्यात येत आहे. किड रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास लगेच त्या शेतकऱ्याला त्या किड रोगाच्या नियंत्रणाचा सल्ला देण्यात येतो व फवारणी प्रात्यक्षिके आयोजित करुन औषधांची सुरक्षीत हाताळणी व कार्यक्षम वापर यावर मार्गदर्शन करण्यात येते. योजनेच्या क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शनाकरीता 20 जुलै रोजी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, वरिष्ठशास्त्र केव्हीके हिवरा व उपविभागीय कृषि अधिकारी गोंदिया यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय एक दिवसीय क्रॉपसॅप प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाला जिल्ह्यातील सर्व कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते.
प्रथम दिप प्रज्वलन करुन वसंतराव नाईक यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी प्रास्ताविक करुन किड रोड सर्वेक्षणाबाबत सर्व क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले व सर्व क्षेत्रिय कर्मचा-यांनी क्रॉपसॅप निरीक्षणे योग्य नोंदवावे त्यामुळे किड व रोगांचे वेळीच व्यवस्थापन करणे सोईचे होईल असे सांगितले.
डॉ.सय्यद अली यांनी भात पिकावरील किड रोग ओळख नुकसान करण्याच्या सवयी या संदर्भात माहिती दिली. राजाभाऊ चव्हाण यांनी भात पिकावरील सर्व किड व रोगांची ओळख त्यांचे जीवनक्रम ईटीएल काढण्याचे प्रमाण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपविभागीय कृषि अधिकारी मंगेश वावधने यांनी किड रोगावरील निरीक्षणे व क्षेत्रभेटी बाबत मार्गदर्शन करुन क्रॉपसॅप अंतर्गत उत्तम कामाबाबत सर्व क्षेत्रिय कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. उपस्थितांचे आभार तालुका कृषि अधिकारी धनराज तुमडाम यांनी मानले.





