
गोंदिया- वडिलांच्या नावे असलेले रास्तभाव धान्य दुकान हस्तांतरित करण्यासाठी 4 हजार रुपयांची लाच मागणार्या येथील तहसील कार्यालयात कार्यरत पुरवठा निरीक्षकास गोंदिया लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज 29 जुलै रोजी सापळा कारवाई करत अटक केली. पंकज तात्याराव शिंदे असे लाचखोर पुरवठा निरीक्षकाचे नाव आहे.सविस्तर असे की, तक्रारदार शेतकरी आहेत. त्यांच्या वडिलांच्या नावे तालुक्यातील लहीटोला/पांढराबोडी येथे सरकारी रास्त भाव धान्य दुकान आहे.त्यांचे वडील कर्करोगाने ग्रस्त असून वयोवृद्ध असल्याने त्यांनी दुकान स्वतःच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे आवश्यक दस्ताऐवजांसह अर्ज केला होता. 27 जुलै रोजी तक्रारदार यांनी आरोपी पंकज शिंदे याला अर्जावर कारवाई करून वडिलांच्या नावे असलेले रास्तभाव दुकान स्वतःच्या नावे हस्तांतरित करण्याची विनंती केली.मात्र यासाठी शिंदे याने तक्रारदारास 5 हजार रुपये लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपतप्रतिबंधक विभाग गोंदियाकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करून आज शुक्रवार 29 जुलै रोजी स्थानिक प्रशासकीय इमारतीच्या कक्ष क्रमांक 12 मध्ये सापडा कारवाई केली. कारवाईत तडजोडी अंति पंचांसमक्ष 4 हजार रुपयाची लाच स्वीकारताना आरोपी पंकज शिंदेला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी शहर पोलिस ठाणे येथे आरोपी विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





