
कोसमतोंडी:- चिचटोला तलावा लगतच्या शेतजमिनी ज्यात कोसमतोंडी, चिचटोला, धानोरी व मुंडीपार चे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांच्या जमिनी मागील चार वर्षापासून पाण्याखाली बुडतात. यावर्षी अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस आल्याने रोवना करण्याआधीच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्यात बुडाल्या.
यासाठी लघु पाटबंधारे विभाग, तहसील ऑफिस व कृषी ऑफिस यांना सूचना देण्यात आली व ग्राम धानोरी येथील हनुमान मंदिरात संयुक्त बैठक घेण्यात आली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व वारंवार पाण्यात बुडणाऱ्या शेत जमिनी वाचवून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा यासाठी माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे मार्गदर्शनात युवा मोर्चाचे तालुका प्रभारी गौरेश बावनकर यांनी पाठपुरावा केला व तसे निवेदन सुद्धा संबंधित विभागाच्या प्रतिनिधींना देण्यात आले.
या प्रसंगी पंचायत समिती सडक-अर्जुनी च्या सभापती संगीता खोब्रागडे, उपसभापती शालिंदर कापगते, तालुका प्रभारी गौरेश बावनकर, पंचायत समिती कोसमतोंडी च्या सदस्य निशाताई काशीवार, धानोरी ग्रामपंचायतचे सरपंच प्यारेलाल पारधी, सरपंच धनराज येडे, गंगाधर कुंभरे, किशोर मडकाम, शामराव कुंभरे, ओम प्रकाश पारधी, हेमराज बिसेन, महेश पटले व अनेक शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या या बैठकीला लघुपाटबंधारे विभागाचे बिसेन, कृषी विभागाचे ब्राह्मणकर व तहसील विभागाचे मनोज डोये, यांनी सभेला मार्गदर्शन करून शेतकऱ्यांची शेती बुडणार नाही यासाठी आश्वासन दिले. शेतकऱ्यांचा त्रास व समस्या मार्गी न लागल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.





