|
गडचिरोली-उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोमके कोटगुल हद्दीतील हेटळकसा जंगल परिसरात कोरची एलओएस, टिपागड एलओएस व कंपनी क्र. ४ च्या नक्षल्यांनी पोलिस पथकांना नुकसान पोहोचवून मोठा घातपात घडवून आणण्याचे उद्देशाने मोठय़ा प्रमाणात दारूगोळा, स्फोटके व इतर साहित्य पुरून ठेवले असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक गोयल यांच्या आदेशाने अपर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली हेटळकसा जंगल परिसरात विशेष अभियान पथक, सीआरपीएफ १९२ बटालियनचे यंग प्लॉटूनचे जवान व बीडीडीएस पथकाचे जवानांनी ४ ऑगस्ट रोजी नक्षलविरोधी अभियान राबवून नक्षल्यांनी लपवून ठेवलेले स्फोटक व इतर साहित्य जप्त करण्यास यश आले.
सदर डंप हे पाण्याखाली वापरण्यात येणार्या प्लास्टिकच्या मोठय़ा टाकीमध्ये लपवून पुरून ठेवण्यात आले. यामध्ये १ नग कुकर त्यापैकी स्फोटकांनी भरलेला एक, ४ नग कार रिमोट, ३ नग वायर बंडल, ८ पॉकेट डिस्टेंबर कलर, पिवळ्या रंगाचा पावडर अंदाजे १ कि.ग्रॅ. राखडी रंगाचा पावडर अंदाजे २ किलोग्रॅम, पांढर्या रंगाचा पावडर अंदाजे १ पाव, पांढरा दाणेदार पदार्थ अंदाजे ५0 किलोग्रॅम, २ नक्षल पुस्तके, १ नग प्लास्टिकची पाणी साठविण्याची टाकी ५00 लीटर क्षमतेची आदी साहित्य हस्तगत करून घटनास्थळावर मिळालेल्या मुद्देमालावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. स्फोटाकांनी भरलेला १ नग कुकर हे पथकाच्या मदतीने जागेवरच नष्ट करण्यात आला. इतर साहित्य गडचिरोली येथे आणण्यात आले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
२८ जुलै ते ३ ऑगस्ट या नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सदर डंप हस्तगत केल्यामुळे या भागात नक्षलवाद्यांना मोठा हादरा बसला आहे. यामुळे नक्षल्यांचे लक्षात आले आहे की, गडचिरोली पोलिस दलाची नजर नक्षल्यांवर असून, सामान्य नागरिकांना वेळीस धरून बळजबरीने नक्षल सप्ताह पाळावयास भाग पाडणे नक्षल्यांना आता अडचणीचे ठरणार आहे. या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी अभियानात सहभागी असलेल्या विशेष अभियान पथक गडचिरोली, सीआरपीएफ १९२ बटालियनचे यंग प्लॉटूनच जवान व बीडीडीएस पथकाचे कौतुक केले आहे. जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचे असून नक्षल्यांनी हिंसक वाट सोडून आत्मसर्मपण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.
जहाल महिला नक्षलवाद्यास अटक
२८ जुलै ते ३ ऑगस्ट नक्षलवादी शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर ३ ऑगस्ट रोजी एटापल्ली पोलिसांनी नाकाबंदी केली असता एक महिला संशयिरित्या आढळून आल्याने जवानांनी तिची चौकशी केली असता तिने बाळगलेल्या साहित्यावरून ती जहाल नक्षली असल्याने जवानांनी तिला अटक केली. मुडे हिडमा मडावी असे अटक करण्यात आलेल्या महिला नक्षलीचे नाव आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक अहेरी अनुज तारे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. अटक करण्यात आली महिला नक्षली ही कसनसूर दलमध्ये सदस्य पदावर कार्यरत असून, ती छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिच्यावर शासनाने २ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. तिचा किती गुन्ह्यामध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.
|