
गोंदिया, दि.12 : गोरेगाव तालुक्याच्या कमरगाव येथील लोधी समाजाची मुलगी सुलोचना बुधराम नागपुरे हिच्यासोबत दुष्कर्म करून तिला मरणासन्न स्थितीत सोडून दिले. त्या नराधम आरोपींना फाशीची फाशीची शिक्षा देण्यात यावी. असे निवेदन महिलांनी दवनीवाडाचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल पाटील व पोलिसांना गुरुवार, 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनानिमित्त रक्षासूत्र (राखी) बांधताना दिले.
निवेदनानुसार, सदर पीडित मुलगी ही लोधी समाजाची असून 30, 31 जुलै व 1 ऑगस्ट रोजी तिच्यासोबत दुष्कर्म करण्यात आले. त्यामुळे तिची प्रकृती अत्यंत गंभीर झाली असून नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये शस्त्रक्रिया व उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितलेल्यानुसार तिच्या प्रायवेट पार्टवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे. तसेच अनेकदा दुष्कर्मही करण्यात आले आहे.या प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर करून यात समाविष्ट आरोपींना समाजाबाहेर करून नराधमांना फाशीच्या शिक्षेची शिफारस करण्यात यावी. तसेच पीडितेच्या कुटुंबाला, लोधी समाजाला व स्त्री जातीला न्याय देण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देतेवेळी सुनीता रवींद्रसिंह लिल्हारे, सुजीता उत्तमसिंह पंडेले, कांटा सुरेन्द्र सूर्यवंशी, सरस्वती हेमेंद्र सूर्यवंशी, पार्वता मोतीलाल लिल्हारे, गायत्री संजय चौरसिया, समिता राजकुमार बिरणवार, कृष्णा प्रभूलाल चौरसिया, माजी पंस सदस्य गुड्डू लिल्हारे आदि उपस्थित होते.यावेळी महिलांनी ठाणेदार राहुल पाटील व इतर पोलीस कर्मचार्यांना रक्षासूत्र बांधून देशातील महिलांच्या रक्षणाचे अभिवचन मिळवून घेतले.





