37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ रानभाज्यांमधील औषधीयुक्त गुणधर्म जाणून घ्यावे : आ.विजय रहांगडाले

रानभाज्यांमधील औषधीयुक्त गुणधर्म जाणून घ्यावे : आ.विजय रहांगडाले

0
23

blank

तिरोडा : रानभाज्यांचे आहारात वेगळे महत्व आहे. आपल्याला रानभाज्यांची माहिती विस्मृत होत चालली आहे. त्यामुळे आपल्या आहारातून त्या हद्दपार होत असल्याने आपल्या आरोग्याला मिळू शकणारे पोषक घटक मिळत नाही. त्यामुळे आपल्या आपल्या आरोग्यासाठी हितकारक असलेल्या या रानभाज्यांची ओळख घ्यावी. त्यांच्यात असलेले औषधीयुक्त गुणधर्म जाणून घ्यावे. असे सांगून रानभाजी महोत्सवात लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढवण्याच्या सूचना तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आ.विजय रहांगडाले यांनी केल्या.

महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाचे औचित्य साधून 9 ते 15 ऑगस्टपर्यंत रानभाजी महोत्सव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने आज 12 ऑगस्ट रोजी तिरोडा तालुक्यात तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन पंचायत समिती सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

महोत्सवाचे उद्घाटक पंस सभापती कुंता पटले यांच्या हस्ते करण्यात आले. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी पंस उपसभापती हुपराज जमईवार होते. कार्यक्रमाला प्रामुख्याने तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समिती, आत्मा, तिरोडाचे अध्यक्ष भाऊराव कठाने, जिल्हा परिषद सदस्य चतुर्भुज बिसेन, पंचायत समिती सदस्य सुनंदा पटले, प्रमिला भलाई, रिता पटले, विजय बिंझाडे, तर प्रमुख मार्गदर्शक कृषी विज्ञान केंद्र हिवराचे कार्यक्रम समन्वयक डॉ.सय्यद साकार अली, तालुका कृषी अधिकारी डी.एल. तुमडाम, मंडळ कृषी अधिकारी (मुंडीकोटा) पी.एन. जीभकाटे, आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक अरविंद उपवंशी, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक उमेश सोनेवाने, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक उपस्थित होते.

रानभाजी महोत्सव

प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी डी.एल. तुमडाम यांनी मांडले. यामध्ये त्यांनी रानभाजी महोत्सवाचे महत्त्व व प्रदर्शन याबाबत माहिती दिली. यानंतर डॉ.सय्यद अली यांनी रानभाज्यामध्ये असलेल्या औषधी गुणधर्म व सेंद्रिय पदार्थांना निर्यातीकरिता असलेला वाव याबाबत माहिती विशद केली.

यानंतर जिल्हा परिषद सदस्य चतुर्भुज बिसेन यांनी रानभाजी दिवसेंदिवस आपल्या आहारातून कमी होत चालल्याचे सांगितले. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला रानभाज्याची ओळख नसल्यामुळे व त्याचे महत्त्व माहीत नसल्यामुळे आपण त्यांचे सेवन आपल्या दैनंदिन आहारात करत नाही. त्याकरिता अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करावे, जेणेकरून लोकांना रानभाज्यांची ओळख व त्यांचे औषधी गुणधर्म तसेच आहारातील महत्त्व कळेल, असे त्यांनी सांगितले.

रानभाजी महोत्सव

त्यानंतर शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष भाऊराव कठाने यांनी, शेतकऱ्यांनी रानभाजीच आहारात समावेश करून घ्यावा असे आवाहन केले. यानंतर पंचायत समिती सदस्य वनिता भांडारकर यांनी रानभाजीचे पाककृती व उपलब्ध असलेल्या रानभाज्याविषयी माहिती दिली.

संचालन आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक अरविंद उपवंशी यांनी केले. आभार उमेश सोनवाने यांनी मानले. महोत्सवात महिला आर्थिक विकास महामंडळातील महिला बचत गट यांनी सुद्धा सहभाग नोंदविला. तसेच महोत्सवात तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank