43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता नागपुरात 19 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या:आधी पेट्रोल पिले त्यानंतर कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून घेतली...

नागपुरात 19 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या:आधी पेट्रोल पिले त्यानंतर कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून घेतली उडी

0
82

blank

नागपूर– एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने पेट्रोल पिऊन इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री नागपुरात घडली आहे. शिवम कटरे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्याचे वय 19 वर्ष इतके आहे. तो BCA द्वितीय वर्षात शिकत होता. आत्महत्या केल्यानंतर सदरील तरुणाला रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम मोरेश्‍वर कटरे (रा. दाभा) असे विद्यार्थ्याचे नाव असून तो सेंट फ्रान्सिस डिसेल्स (एसएफएस) महाविद्यालयातील विद्यार्थी आहे. तो बीसीए द्वितीय वर्षाला शिकत होता. शुक्रवारी सकाळी महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी आला होता. परीक्षा संपल्यावर तो तिसऱ्या माळ्यावर गेला आणि त्यानंतर त्याने उडी घेतली. अचानक तो खाली पडल्याचे विद्यार्थ्यांना दिसून आले. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली असता, शुभमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

अकस्मात मृत्यूची नोंद

दरम्यान मित्रांनी त्याला एलेक्सीस रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. शिवमचे वडील मोरेश्‍वर कटरे (वय 46) हे इलेक्ट्रिशियन आहेत. गेल्या काही दिवसांपासून तो बऱ्याच तणावात असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली. यावेळी सतत माझ्याकडून ते होऊ शकणार नाही असे म्हणायचा. त्यातून त्याने मित्रांशीही बोलणे जवळपास बंद केले होते. आज एकटाच तो महाविद्यालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर गेला आणि त्याने उडी घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी प्राथमिक तपासात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

प्राध्यापकांचा गाडी देण्यास उशीर ?

शिवमने तिसऱ्या माळ्यावरुन उडी घेतल्यावर तो रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला होता. यावेळी त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी प्राध्यापकांनी संवेदनशीलता दाखवत कार काढणे अपेक्षित होते. मात्र, यावेळी प्राध्यापक एकमेकांकडे बघत असल्याचे दिसून आले. १५ मिनिटे वाया गेल्याने उपचारास उशीर झाला आणि प्रकृती बिघडल्याचा आरोप आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.टी. थॉमस यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

तीन तासांचे बिल १ लाख १० हजार रुपये

जखमी शिवमला ज्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले तेथे त्याच्या वडिलांना आधी ४० हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. साधारण तीन तासानंतर रुग्णालयातच शिवमचा मृत्यू झाला. मात्र, तीन तासात रुग्णालयाने १ लाख १० हजार रुपये बील काढले. प्रथम पालकांनी ४० हजार रुपये भरले होते. मात्र, परिस्थिती नसल्याने त्यांना उर्वरित ७० हजार रुपये भरता येणे शक्य नव्हते. तरुण मुलाच्या आत्महत्येने आधीच ते मानसिक धक्क्यात आहेत. त्यातच आणखी ७० हजार रुपये भरण्याची त्यांची परिस्थिती नाही. ‘आम्ही रुग्णालय प्रशासनाशी या संबंधात बोलू’ असे आम आदमी पार्टीचे प्रभात अग्रवाल यांनी सांगितले.

blank