
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 45 सदस्यांचे 5 शोध बचाव दल तैनात
गोंदिया,दि.15 : मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पुर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दि.15 ऑगस्ट 2022 रोजी जिल्ह्यात 173.5 मि.मी.पावसाची (अतिवृष्टी) नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण 97 गावांचे प्रमुख रस्ते बंद झाले होते. अशा वेळेस गोंदिया तालुक्यातील बाघनदी व वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या गावांमध्ये जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी पूरग्रस्त गावांना भेटी देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. काही ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे. गोठे पडलेले आहेत. जनावरांचे नुकसान झालेले आहे. ही बाब विचारात घेऊन जिल्हाधिकारी गोंदिया श्रीमती नयना गुंडे यांनी दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी रावणवाडी, जीरुटोला, कासा, भद्याटोला इत्यादी पूरग्रस्त गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला व पूरग्रस्त गावाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांचे समवेत अपर जिल्हाधिकारी श्री. राजेश खवले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, परवणी पाटील, उपविभागीय अधिकारी गोंदिया, कार्यकारी अभियंता बाघ इटीयाडोह राज कुरेकार, महेश भांडारकर, अभिषेक यादव व इतर विविध अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी गोंदिया यांनी पूर परिस्थितीचे निरीक्षण करून नागरिकांना धीर दिला. शासनाच्या विविध विभागांना पूरग्रस्त भागामध्ये आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच ज्या नागरिकांना पुराचा फटका बसलेला आहे, ज्यांची घरे पाण्यामध्ये बुडालेली आहेत, पशुधनाचे नुकसान झालेले आहे अशांचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकारी गोंदिया यांनी यावेळी दिले.
विशेष महत्त्वाचे म्हणजे, यावेळी अनेक रस्त्यांवर अडसर निर्माण झाला होता. काही ठिकाणी पाणी साचले होते. या सर्व अडचणींवर मात करून जिथपर्यंत जाता येणे शक्य आहे त्या शेवटच्या टोकापर्यंत जिल्हाधिकारी यांनी जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली. याबद्दल नागरिकांनी समाधानाची भावना व्यक्त केलेली आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 40 नागरिकांचे रेस्क्यू
जिल्ह्यात बाघ नदीच्या काठावरील असलेल्या सालेकसा 20, आमगाव 4, गोंदिया 12 या तालुक्यातील नागरिकांना पुरामधून सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच सडक-अर्जुनी येथील 4 नागरिकांना स्थानिक पथकाने वाचविण्याचे कार्य केले. पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी व नागरिकांना पूरामधून बाहेर काढण्यासाठी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या मार्गदर्शनात आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रत्येकी 8 सदस्यांचे 5 प्रतिसाद दल तयार करण्यात आले होते. व प्रत्येक उपविभागात एक एक शोध व बचाव दल पाठविण्यात आले होते. तसेच 8 सदस्यांचे एक अतिरिक्त दल जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियंत्रण कक्षात राखीव ठेवण्यात आले होते.
पूर परिस्थिती नियंत्रणासाठी व नागरिक आणि प्रशासनामध्ये समन्वय ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर तालुका निहाय चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये गोंदिया व तिरोडा तालुक्याची जबाबदारी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांना, गोरेगाव तालुक्याची जबाबदारी श्रीमती स्मिता बेलपत्रे उपजिल्हाधिकारी (सामान्य) यांना आमगाव, सालेकसा व देवरी तालुक्यातील जबाबदारी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सुभाष चौधरी यांना व अर्जुनी-मोर गाव तालुक्याची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे यांना देण्यात आली होती .
जिल्हा पोलिस अधिक्षक विश्व पानसरे यांच्या नेतृत्वात पोलीस विभाग, गृहरक्षक विभाग, अग्निशमन दल व भारतीय राखीव बटालियन यांचे एकूण 45 सदस्यांना पूर परिस्थिती हाताळण्यासाठी व नागरिकांची पूरपरिस्थिती पासून सुटका करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. तसेच पोलीस विभागात राखीव 50 जवान यांना आवश्यकता भासल्यास पोलीस मुख्यालय कारंजा येथे राखीव ठेवण्यात आले होते.
पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती
गोंदिया जिल्ह्यात 15 ऑगस्ट रोजी पूर परिस्थितीमुळे 139 गाव बाधित झाल्यामुळे 97 मार्ग बंद होते. त्यामुळे एकूण 155 कुटुंबातील 508 नागरिकांना वेगवेगळ्या तालुक्यात तयार करण्यात आलेले मदत केंद्र व शिबिर येथे ठेवण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यातील 4 घरे पूर्णतः व 1598 घरे अंशतः तसेच 625 अंशतः गोठ्यांचे नुकसान झाले व 11450 कोंबड्यांची व 16 जनावरांची देखील मृत्यू झाल्याची नोंद आहे. यामध्ये एकही मनुष्य हानी नाही हे म्हणजे विशेष. पूर परिस्थिती पूर्णपणे ओसरली नाही त्यामुळे सदर नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचे नागरिकांनी आवाहन
आपत्ती दरम्यान नागरिकांच्या कोणत्याही मदतीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. आपत्ती दरम्यान प्रशासनान व नागरिकांनी एकमेकांशी समन्वय ठेवून पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी एकत्रित यावे. सद्यस्थितीत धरण, जलाशय इत्यादींमध्ये पाण्याची पातळी वाढत असून पाण्याचा विसर्गामुळे नदी काठावरील गावांमध्ये संभाव्य पूर परिस्थितीचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आज रोजी जिल्ह्यात पूरपरिस्थिती नाही. परंतु सद्यस्थितीत धरण, जलाशय, तलाव, नद्या, नाले इत्यादींमध्ये पाण्याची पातळी वाढली असून अशा ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात उतरू नये. तसेच या ठिकाणी सेल्फीचे मोह टाळावे व पाण्यात बोटिंग करताना लाइफ जॅकेटचा वापर करावा तसेच बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त नागरिकांनी बसू नये. पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, या दरम्यान विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.





