
गोंदिया,दि17:-देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘हर घर तिरंगा, घरघर तिरंगा’ मोहीम केंद्रशासनाच्या आदेशाने राबविण्यात आली. त्याच आदेशाचे पालन करून प्रशासनाने तिरंगा वाटपाचा कार्यक्रम यशस्वी केला असताना नैसर्गिक आपदेने गरीब नागरिकांच्या आनंदावर विरजण घालण्याचे कार्य मोठ्या प्रमाणावर केले. देवरी शहरात अतिवृष्टीने कहर करीत अनेक गरीबांचे घर जमीनदोस्त केले. अशात मदतकार्य करायला गेलेल्या नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना बिलगून काही आपादग्रस्तांनी “साहेब, तुम्ही घरावर झेंडा लावाले सांगितल्या जी, पण मी आता झेंडा कोठी लावू जी”, असे म्हणत आर्त टोहो फोडला.
देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशवासीयांनी तो धडाक्यात साजरा करण्याचा चंगच बांधला. हा उत्सव नागरिकांना साजरा करता यावा यासाठी प्रशासनही राबराब राबले. गरीब नागरिकांनीसुद्धा “एकवेळ उपाशी राहू, पण झेंडा घेऊ” असे म्हणत पदरमोड करीत झेंडा सुद्धा घेतला. असे असताना नियतीने मात्र साथ दिली नाही. एकीकडे सतत पडणारा मुसळधार पाऊस, तर दुसरीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. आदल्या दिवसी आपण लवकर उठून झेंडा फडकविण्याचे स्वप्न उराशी बाळगून हातावर कमाविणारे झोपी गेले. उद्या त्यांच्या नशिबात काय वाढून ठेवले,याची पुसटशी कल्पना सुद्धा त्यांना नसावी. रात्रभर पडणाऱ्या पावसाने अनेकांचे घर जमीनदोस्त केले. असाच प्रकार देवरी शहरात सुद्धा घडला. अशा आपादग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारे मुध्याधिकारी अजय पाटणकर यांचे संवाद साधला असता त्यांनी खालील प्रतिक्रिया व्यक्त केली.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा दिवस. पहाटे 5 पासूनच फोन खणखणत होता. आदल्या दिवसी सर्व कामे पूर्ण करून रात्री उशीरा झोपल्याने गाढ झोप लागली होती. फोन सतत वाजल्याने झोपमोड झाली पहातो तर काही वेळातच नगरअध्यक्षांचे , नगरसेवक , नागरिकांचे ही मिस कॉल दिसले. काही घरामध्ये पाणी घुसले आहे. काही घर पडले आहेत. काही लोक ढिगाऱ्याखाली फसली आहे आणि बरेच काही अशी हादरून टाकणारी माहिती मिळाली. लगेच बाल्यावस्थेत असणार्या आमच्या अग्नीशमन विभागाला संपर्क साधून स्पॉटवर पोहोचण्याचे आदेश दिले.
ध्वजारोहण कार्यक्रम असल्याने त्या तयारीची लगबग सुद्धा होतीच. घटनास्थळीर पोहोचल्यावर अग्नीशमन विभागाने अत्यंत जलद गतीने काम करण्यास सुरवात केली. बरोबर स्वछता विभाग ही कामाला लागला. धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे पत्याच्या खेळातील बंगल्याप्रमाणे घरे कोसळत होती. लोकांचे धाय मोकलून रडणे बघून काळजाला तडा जात होता. आपोआप आमच्या ही अश्रूंचा बांध फुटत चालला होता. आम्ही आमच्या परीने लोकाना स्थलांतरित करण्यात, इतर सोय करण्यात व्यस्त होतो. त्यातच एक वयोवृद्ध सुरकुतलेल्या चेहर्याची म्हातारी जवळ आली अणि म्हणाली, “साहेब तुम्ही तर घरावर झेंडा लावण्याला सांगितले, आता कोटी झेंडा लावू ?” असे बोलून तिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आम्ही मात्र अनुत्तरीत झालो. एवढ्या सगळ्या परिस्थितीत आमच्या कार्यालयातील झेंडा वंदनाला उपस्थित राहणेच राहून गेले. मात्र ध्वजारोहणाची जय्यत तयारी पूर्ण करून ठेवल्याने अध्यक्षांनी ध्वजारोहण अत्यंत काळजीपूर्वक पूर्ण केले.
प्रशासनान/पदाधिकारी आपल्या परीने मदत करण्याचा, धीर द्यायचा प्रयत्न करत आहेतच. परंतु, त्या मोडलेल्या संसाराना दातृत्वाची खूपच गरज आहे. त्यांना जगण्याची प्रेरणा मिळण्यासाठी सर्वांच्या पाठबळाची नितांत गरज आहे. त्यावर नागरिकानां ऐकमेकानां सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी पाटणकर यांनी केले आहे.





