
गोंदिया,दि.20 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-2022 येत्या 21 ऑगस्ट 2022 रोजी गोंदिया येथे पाच उपकेंद्रावर दोन सत्रात गोंदिया येथील एस.एस.गर्ल्स कॉलेज विठ्ठलनगर, एस.एस.अग्रवाल गर्ल्स हायस्कुल विठ्ठलनगर, महावीर मारवाडी हायस्कुल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स विठ्ठलनगर गांधी स्टेडियम जवळ, बी.एन.आदर्श सिंधी विद्यामंदिर हायस्कूल मुर्री रोड, राजस्थान कन्या विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् कुष्णपुरा वार्ड मोटवानी चेंबर जवळ गोंदिया या परीक्षा केंद्रावर सदर परीक्षा घेण्यात येणार आहे.
परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात कोणासही कसल्याही प्रकारचे अस्त्र, शस्त्र व कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे उदा. कॅलक्युलेटर, मोबाईल, लॅपटॉप, पेजर, फॅक्स मशीन, झेरॉक्स मशीन इत्यादींचा वापर किंवा जवळ बाळगण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
या परीक्षा प्रक्रिये दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 ची कलम 144 चे मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. सदर आदेश दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी जयराम देशपांडे यांनी कळविले आहे.