
अनेक कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात राहणारे JNU पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या विद्यापीठाच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी सोमवारी महादेव शूद्र असल्याचे असल्याचे नमूद करत कोणताही देव ब्राह्मण नसल्याचा दावा केला. ‘महादेव स्मशानभूमीत वास्तव्य करतात. त्यामुळे ते अनुसूचित जाती (SC) किंवा अनुसूचित जमातीचे (ST) असावेत. याशिवाय मनुस्मृतीनुसार सर्व महिला शूद्र आहेत. यामुळे कोणतीही महिला ब्राह्मण असल्याचा दावा करू शकत नाही,’ असे त्या म्हणाल्या.
हिंदू धर्म ही जीवनपद्धती असेल तर टीकेचा देखील स्वीकार करा
जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित सोमवारी डॉ. आंबेडकर व्याख्यानमालेअंतर्गत ‘डॉ. बी. आर. आंबेडकरांचे विचार जेंडर जस्टिस: डीकोडिंग द युनिफॉर्म सिव्हिल कोड’ या विषयावर बोलत होत्या. हिंदू हा केवळ धर्म नसून एक जीवनपद्धती आहे आणि जर जीवन जगण्याची पद्धत असेल तर त्यावर टीका करायला लोक का घाबरतात, त्यावर टीका केल्यास विरोध का होतो असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
आंबेडकरांचे विचार आत्मसात केले पाहिजेत
यावेळी बोलताना पुढे त्या म्हणाल्या की, सर्व देवी-देवता अगदी स्त्रियाही उच्चवर्णीय नाहीत मग समाजात जातीभेद का? अजूनही समाजात सुरु असलेला हा जातीभेद अमानवी असून बाबासाहेबांच्या विचारांचा आपण पुनर्विचार करत आहोत हे अत्यंत महत्वाचे आहे. गौतम बुद्ध हे असे पहिले होते ज्यांनी आपल्या समाजातील भेदभाव-जातीय द्वेषाच्या विरोधात लोकांना जागृत केले.
हिंदू देव उच्चवर्णीय नाहीत, स्त्रिया शूद्र
कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी नऊ वर्षांच्या मुलासोबत झालेल्या जातीय हिंसाचारावर आपले मत व्यक्त करताना सांगितले की, कोणतीही देवता ब्राह्मण नसून नाहीउच्चवर्णीय देखील नाही. मानववंशशास्त्रीयदृष्ट्या बहुतांश लोकांना त्यांच्या देवांचे मूळ माहित असले पाहिजे. कोणताही देव ब्राह्मण नाही किंवा सर्वोच्च क्षत्रिय नाही. यावेळी बोलताना त्यांनी भगवान शंकरावर देखील विधान केले, भगवान शंकर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचे देखील असू शकतात. कारण ते असे देवता आहेत ज्यांचं वास्तव्य स्मशानभूतमीत देखील असते, ज्यांच्या गळ्याला नाग असतो. ब्राह्मण स्मशानात बसू शकेल असे मला वाटत नाही. कुलगुरू म्हणाले की लक्ष्मी, शक्ती किंवा अगदी जगन्नाथ यासह इतर सर्व देवता मानववंशशास्त्रीयदृष्ट्या उच्च जातीतून आल्याचे दिसत नाही. खरे तर भगवान जगन्नाथ हे आदिवासी मूळचे आहेत.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी असाही दावा केला की सर्व महिला शूद्र आहेत. कोणतीही स्त्री ती ब्राह्मण किंवा इतर जातीची असल्याचा दावा करू शकत नाही. स्त्रियांना त्यांची जात ही केवळ लग्नामुळे किंवा वडिलांच्या जातीतून मिळते.





