
मुंबई : विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाच्या आमदारांनी थेट शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाच लक्ष्य केले आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळांच्या पायऱ्यावर आदित्य ठाकरे यांचे घोड्यावर उलट्या दिशेने बसलेल्या व्यंगचित्राचे बॅनर झळकावत घोषणाबाजी केली. आम्ही मातोश्री आणि ठाकरे कुटुंबावर टीका करणार नसल्याचे वारंवारपणे शिंदे गटाकडून सांगण्यात येत होते. मात्र, मागील दोन दिवसांपासून शिंदे गटाने मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केले आहे.
विधीमंडळ अधिवेशनात शिवसेना आणि महाविकास आघाडीत संघर्षाची ठिणगी पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. विधीमंडळ अधिवेशन सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारपासून शिंदे गटानेही महाविकास आघाडी आणि विशेषत: शिवसेनेविरोधात घोषणाबाजी सुरू केली. बुधवारी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात बाचाबाचीदेखील झाली होती.
आदित्य ठाकरे यांच्यावर आज शिंदे गटाने जोरदार हल्ला चढवला.
> पर्यटन खाते घेऊन घरातच बसून केला कहर, सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली कहर
> पुन्हा निवडणूक लढवण्याची देतात ठसन, स्वत: आमदार व्हायला महापौर आणि दोन एमएलसीचे लागते कुशन
> खुर्चीवर बसल्यावर शिवसैनिकाला केले तडीपार, सत्ता गेल्यावर फिरतात दारोदार
> युवराजांची ‘दिशा’ नेहमीच चुकली
या घोषणादेखील शिंदे गटाच्या आमदारांनी झळकाल्या. शिंदे गटाच्या या घोषणाबाजीमुळे शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.