37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ समुदाय आरोग्य अधिकाय्रांच्या गलथान कारभारामुळे मातेचा दुर्दैवी मृत्यु

समुदाय आरोग्य अधिकाय्रांच्या गलथान कारभारामुळे मातेचा दुर्दैवी मृत्यु

0
66

blank

आमदार कृष्णा गजबे यांच्या मुळ गावातील घटना : तालुका आरोग्य विभाग प्रकरण दडपण्याच्या मार्गावर

देसाईगंज दि ६::= मुख्यालयी न राहणे, वरिष्ठांची परवानगी न घेता मुख्यालय सोडणे तसेच खाजगी व्यवसाय करुन राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्याशी केलेल्या करारनाम्यातील अटी शर्ती चे भंग केल्याची कार्यवाही शासनस्तरावर प्रलंबीत असतांनाच आता नवीनच गंभीर प्रकार उघडकिस आला असुन समुदाय आरोग्य अधिकाय्रांच्या खाजगी रुग्णालयातील गलथान कारभारामुळे दोन वर्षांपूर्वी एका मातेचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची गंभीर तेवढीच धक्कादायक घटना आता उघडकिस आली असली तरी, या बाबतीत प्रचंड गोपनियता ठेवुन तालुका आरोग्य विभाग प्रकरण दडपण्याच्या मार्गावर असल्याचे सांगीतले जात आहे.
देसाईगंज तालुक्यातील पोटगाव येथील भारती आकाश मेश्राम वय २१ हिच्या दुसय्रा खेपेतील प्रसुतीच्या कळा दि ३/१०/२०२० ला पहाटे १ वाजता पासुन येऊ लागल्या. खाजगी वाहनाने देसाईगंज वडसा येथील समुदाय आरोग्य अधिकारी असलेल्या डॉ अनिल नाकाडे यांच्या देसाईगंज शहरातील खासगी वैद्यकीय व्यवसाय असलेल्या मातृछाया रुग्णालयात पहाटे ४ च्या सुमारास भरती करण्यात आले. त्यांनतर सकाळी ६.१५ वाजता सामान्य प्रसुतीतुन एका गोंडस् बाळाला जन्म दिला.
मात्र,सामान्य प्रसुतीनंतर बय्राच वेळा पर्यंत प्लॉसंटा नाळ पुर्णत: बाहेर आलेच नाही. अशा वेळी स्त्रीरोग तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच पुढील उपचार करणे अत्यावश्यक असतांना समुदाय आरोग्य अधिकारी असलेल्या डॉक्टर नाकाडे दांपत्यांनी बाळाची मातेच्या गर्भाशयात राहिलेली नाळ जोरात ओढल्याने अति रक्तस्राव झाले. त्यांनतर काही वेळातच माता बेहोश झाली. प्रकरण हाता बाहेर गेल्याने,अंगलट येण्याची शक्यता वर्तवुन सकाळी ९.३० वाजता खाजगी रुग्णालयातुन डिस्चार्ज दिला.
सदर बेहोश झालेल्या मातेला त्याच अवस्थेत नातेवाईकांनी आपल्या राहते घरी परत घेऊन गेले. ह्या धक्कादायक घटनेची माहिती पोटगाव येथील आशा वर्कर व आरोग्य सेविकेला कळताच तातडीने प्राथमिक उपचार करुन आरमोरी उप जिल्हा रुग्णालयात हलविले.तो पर्यंत बराच रक्तस्राव झाले होते. सकाळी ११.१५ च्या सुमारास सदर मातेला सेवेतील कार्यरत वैद्यकिय अधिकाय्रांनी मृत घोषीत केले.
पोटगाव येथील मातेच्या मृत्यु बाबत तालुका आरोग्य विभागाने मागील दोन वर्षांपासून प्रचंड गोपनियता बाळगुन चौकशी देखिल बसवली आहे.परंतु ह्यामुळे तालुका आरोग्य विभागाचीच बदनामी होईल. यामुळे,हे प्रकरण आरोग्य विभाग दडपण्याच्या मार्गावर असल्याचे सांगीतले जात असल्याने दोषींवर व दोषींना पाठीशी घालणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.
*****

चोकशीत दोषी तरीही खाजगी व्यवसाय सुरूच

देसाईगंज कार्यक्षेत्रातील एकुण १० आरोग्यवर्धिनी केंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी मुख्यालयी न राहणे वरिष्ठांची परवानगी न घेताच मुख्यालय सोडणे व खाजगी व्यवसायात दोषी आढळुन आले आहेत. या दोषी समुदाय आरोग्य अधिकारी यांनी नवी शक्कल लढवून आपल्या खाजगी व्यवसाय असलेल्या दवाखान्यात शहरात अस्तित्वात नसलेल्या दुसऱ्या डॉक्टरच्या नावाची पाटी लावून आत मध्ये मात्र समुदाय आरोग्य अधिकारी बेधडक खाजगी व्यवसाय करीत असुन तालुका वैद्यकीय प्रशासन मात्र यात बघ्याची भूमिका वटवित आहे.

परिपत्रकाला केराची टोपली

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमामध्ये डॉक्टर्स कार्यरत आहेत. सदर डॉक्टर मुख्यालयी न राहता व परवानगी न घेता मुख्यालय सोडुन खाजगी व्यवसाय करित असल्याच्या व त्यामुळे त्यांच्या दैनंदिनी कामावर विपरित परिणाम होत असल्याच्या तक्रारी जिल्हास्तरावरुन प्राप्त होत होत्या. त्या अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राआसोमुं/ आस्था/ डॉक्टर/ खाजगी व्यवसाय बंदी/ ४६९२-४/६२-२०२१ अन्वये दि १२/४/२०२१ ला धोरणात्मक निर्णय घेऊन परिपत्रक काढले असले, तरी या परिपत्रकाची तंतोतंत अंमलबजावणी न करता तालुका वैद्यकीय पातळीवर अक्षरशः केराची टोपली दाखवली जात आहे.

मातृछायानेच हरविले मातृछाया

आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे मातृछाया हॉस्पिटलमध्ये जन्मतः मातृछाया हरविलेला सोहम आकाश मेश्राम दोन वर्षांचा आहे. जन्माला आला तेव्हा २ किलो ८५० ग्रॅम होता. सध्या तरी आरोग्य दृष्ट्या सुदृढ व निरोगी आहे. सोहमच्या वडिलांनी दुसरा विवाह, त्याच्या मावशी सोबतच केला असला तरी खय्रा आईच्या संगोपनापासुन मात्र कायमचा मुकला हे तेवढेच खरे….

प्रतिक्रिया

पोटगाव येथील मातामृत्यू प्रकरण तालुका वैद्यकीय प्रशासनाकडून दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे खरे नाही, शवविच्छेदन अहवाल आम्हाला अप्राप्त आहे, चौकशी करून वरिष्ठांना सादर केला आहे…

डॉ अभिषेक कुंमरे, तालुका वैद्यकीय अधिकारी, देसाईगंज

blank