
चिचगड,दि१० – चिचगड पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या पिपरखारी येथील विद्युत खांबावरील काही साहित्य काल शुक्रवारी (दि.9) चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेची नोंद चिचगड पोलिसात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महावितरणचे कर्मचारी देवेंद्र तुरकर यांनी याविषयी चिचगड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या चोरीच्या घटनेत १) व्हीक्रॉस १नग, अंदाजे किंमत २ हजार, २) लोखंडी स्टे एक नग किंमत सातशे रुपये ३) व्हीक्रॉस क्लेम २ नग किंमत दोन हजार रु. ४) स्टे तार पंचवीस फूट किंमत आठशे रुपये ५) इन्सुलेटर दोन नग किंमत 1000 रुपये असा एकूण 6500 रुपयाचे साहित्य चोरीला गेले आहे.
सदर चोरीच्या प्रकरणी, चिचगड पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून अवघ्या आठ तासात चोरांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी अनिल माणिकलाल चामलाटे (वय 24), भूमेश्वर बिरालाल चामलाटे (वय 22) दोन्ही राहणार, पंढरपूर(सावली) तालुका देवरी यांना आरोपी म्हणून अटक केली आहे.
या प्रकरणाचा तपास ठाणेदार शरद पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार जयसिंग सोंजाल, कमलेश शहारे, सुधाकर शहारे, नितीन खोब्रागडे, संदीप तांदळे यांनी करून जलद गतीने आरोपींना जेरबंद केले. पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे चिचगड परिसरात या पोलिस चमूच्या कार्याचे गौरव केले जात आहे. चिचगड पोलिसात भादंविच्या कलम 379 आणि 34 अन्वये गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास फौजदार जयसिंग सोंजाल हे करीत आहेत.