मुंबई, दि. १० सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के यांनी आज दिनांक १० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार स्विकारला. मावळते कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी प्रा. दिगंबर शिर्के यांना कुलगुरू पदाचा कार्यभार सोपविला. याप्रसंगी मावळते प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्रभारी कुलसचिव प्रा. शैलेंद्र देवळाणकर, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. अजय भामरे, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. राजेश खरात, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा मजूमदार, वित्त व लेखा अधिकारी प्रा. (सीए.) प्रदीप कामथेकर यांच्यासह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, संचालक, विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फोर्ट संकुलातील व्यवस्थापन परिषदेच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित करताना कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के म्हणाले की, मुंबई विद्यापीठ हे देशातील अग्रगण्य विद्यापीठ असून या विद्यापीठाची धुरा आपल्या खांद्यावर सोपविल्याबाबत त्यांनी मा. राज्यपाल तथा कुलपती श्री. भगत सिंह कोश्यारी यांचे आभार मानले. मुंबई विद्यापीठाने ज्ञानदानाचा ऐतिहासिक वारसा आणि समृद्ध परंपरा अविरतपणे जोपासली आहे. ही प्रक्रिया निरंतर ठेवण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून त्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे, विविध प्राधिकरणांच्या निवडणूका, परीक्षा पद्धती आणि कोव्हीडच्या प्रभावामुळे प्रभावित झालेले एकेडमिक कॅलेंडर ही प्राथमिकता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.