
गडचिरोली- नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या आवश्यक १४ सेवा आता गतिमान करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, विविध दाखले, योजनांचे अनुदान, शायकीय मदत तसेच फेरफार अशा सेवा आता अर्ज दाखल झाल्यानंतर आठवड्यात मार्गी लागतील. यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सांगितले. बँका, महसूल व जिल्हा परिषदेंतर्गत येणार्या सेंवाबाबत काही कारणांस्तव बराच विलंब लागत असल्याचे निदर्शनास आले होते. यातील त्रुटी दूर करून नागरिकांना महाराजस्व अंतर्गत वेळेत सेवा देण्यासाठी परिपत्रक काढण्यात येणार आहे.
राष्ट्रनेता ते राष्ट्रपीता सेवा पंधरवडा अंर्तगत गोंडवाना विद्यापिठ गडचिरोली येथे जिल्हाधिकारी संजय मिणा यांच्या संकल्पनेने व तहसिल कार्यालय गडचिरोली यांच्या वतीने महाराजस्व अभियान व कर्ज वितरण मेळावा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून राहुल मीणा हे लाभले. कार्यक्रमास जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक युवराज टेभुंणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर, प्रकल्प संचालक (आत्मा) संदिप कराळे, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, तालुका कृषी अधिकारी प्रदिप वाहने, विदर्भ कोकोण ग्रामीण बॅंकेचे व्यवस्थापक गजानन भादेश्वर, वैद्यकीय अधिकारी विनोद बिटपल्लीवार उपस्थित होते.
महाराजस्व अभियान अंर्तगत महसुल विभाग, पंचायत समिती, कृषी विभाग, भुमी अभिलेख, वनविभाग, आरोग्य विभाग व इतर शासकिय विभागाचे सेवा व सुविधा नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून प्रदान करण्यात आल्या. कर्ज वितरण मेळाव्यामध्ये एकुण १४ राष्ट्रीयकृत व खाजगी बँकानी कर्ज देण्याकरिता स्टॉल लावून नागरिकांना गतीशील व सुलभ रितीने कर्ज मागणी प्रकरणाचा निपटारा करण्यात आला. महाराजस्व अभियान व कर्ज वितरण मेळाव्याअंतर्गत नागरिकांनी उपलब्ध सेवा सुविधांचा लाभ घेतला. यावेळी नागरीक मोठय़ा संख्येने उपस्थित होते





