भंडारा- हंगामा बघण्यासाठी घेऊन गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच ओळखीच्या दोघांनी एका झोपडीत अत्याचार केल्याची घटना तुमसर तालुक्यातील देवनारा येथे बावनथडी नदीपुलाशेजारील झोपडीत घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत. आरोपींपैकी एक विधिसंघर्ष बालक आहे.
पोलिस सुत्रानुसार, पीडित अल्पवयीन मुलीची अभिषेक प्रल्हाद कुंभरे (वय २0) रा. चिखली, ता. तुमसर आणि विधिसंघर्षबालक यांच्याशी ओळख आहे. ५ ऑक्टोबर रोजी दोन्ही आरोपींनी संगणमत करून पिडीतेला लगतच्या मध्यप्रदेशातील बोनकट्टा (म. प्र.) येथे हंगामा पहायला चल म्हणून मोटार सायकलने सोबत घेऊन गेलेत.
दरम्यान, मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास दोघांनीही पीडित अल्पवयीन मुलीला देवनारा येथील बावनथडी नदीवरील पुलाशेजारील झोपडीत नेले. तिथे तिच्याशी आळीपाळीने अत्याचार केला. हा प्रकार अल्पवयीन मुलीने आपल्या आईवडिलांना सांगितला. त्यानंतर आईवडिलांनी तिला घेऊन गोबरवाही पोलिस ठाणे गाठून दोन्ही आरोपींविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी अभिषेक प्रल्हाद कुंभरे आणि विधीसंघर्षबालकाविरुद्ध कलम ३७६, २ (आय), ३७६ (ड, अ,), ३४, भा. दं. वि. सहकलम ४,६. लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २0१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी रिना जनबंधू यांनी भेट दिली. या घटनेचा अधिक तपास गोबरवाहीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील करीत आहेत.