
👉🟪👉आमदार वैभव नाईकांनी केला थेट आरोप
कणकवली :-सत्ताबदल झाल्यानंतर राज्यातील आणि केंद्रातील तपास यंत्रणांचा वापर करत विरोधकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न नितेश राणे व नारायण राणे यांनी सुरु केला आहे.या कारवाईमागे राणे कुटूंबीय आहे. निश्चितपणे चौकशीतून सत्य बाहेर येईल, कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे असे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
👉आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे की, एसीबीच्या चौकशीला मी पुर्णपणे सहकार्य करत आहे. या चौकशी मागे कोणाचा हात होता हे आता नितेश राणेंच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणार्या नितेश राणेंना शिवसैनिक जशास तसे उत्तर देतील.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने, शिवसैनिकांनी आणि महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचा आणि सिंधुदुर्गवासीयांचा मी आभारी आहे. या मोर्चातून मला पुढील काळात लढण्याची ताकद मिळाली.
👉नाईक यांनी पत्रकात म्हटले आहे की, मी 1996 पासून व्यवसायात आहे. माझी कोणतीही बेनामी मालमत्ता नाही. एक रुपयाही गैरमार्गाने मिळवलेला नाही. सत्ता बदल झाल्यानंतर राज्यातल्या आणि केंद्रातल्या तपास यंत्रणांचा वापर करत विरोधकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न नितेश राणे व नारायण राणे यांनी सुरु केला आहे. या कारवाई मागे राणे कुटूंबीय आहे. निश्चितपणे या चौकशीतून सत्य बाहेर येईल, कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे.
👉गेल्या दोन निवडणुकीत नितेश राणे व नारायण राणेंना जिल्ह्यातील जनतेने नाकारले.ते ज्या पक्षात गेले त्या पक्षानेही त्यांना नाकारले आहे म्हणून सच्च्या कार्यकर्त्यांची, शिवसैनिकांची त्यांना कदर असणार नाही.एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सभेत बोलण्याच्या मर्यादा पाळा, कायदा व सुव्यवस्था राखा असे सांगत आहेत.आणि दुसरीकडे एका माजी मुख्यमंत्र्यांवर नीतेश राणे अशी खालच्या पातळीवर टीका करत असतील तर त्यांच्यावर सरकार कारवाई का करत नाही? आता आम्ही आमच्या पध्दतीने तक्रार दाखल करू.
👉1996 पासून मी व्यवसाय करतो. माझ्या व्यवसायात नफा होतो त्याप्रमाणे संपत्तीत वाढ होत आहे.त्यावेळी मी राजकारणातही नव्हतो. सचोटीने व्यवसाय केला. माझी मालमत्ता मी आणि कुटूंबियांनी निवडणुकीच्यावेळी प्रतिज्ञापत्रात दाखवलेली आहे.गेल्या निवडणुकीत माझी मालमत्ता वाढली कारण माझ्या वडीलांचे निधन झाल्यानंतर कुटूंबाच्या वारसहक्काने मालमत्ता माझ्या आणि भावाच्या नावावर वर्ग झाली.सर्व मालमत्ता आम्ही रितसर दाखवल्या आहेत. एक – एक रुपयाचा आणि जागेचा हिशोब दाखवलेला आहे.
👉एक रुपयाची प्रॉपर्टी जरी गैरमार्गाने मिळवली असेल तर कोणत्याही कारवाईस तयार आहे.पण राणेंच्या मुलांचा कोणता व्यवसाय आहे? नितेश राणेंनी स्वतःच्या हिंमतीवर कोणता व्यवसाय केला आहे, हे त्यांनी सांगावे, असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.