रुग्णवाहिका चालक ८ महिन्यांपासून वेतनविनाच

0
35

गोंदिया-राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक केंद्रांना रूग्णवाहिका पुरविण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या रूग्णवाहिकांच्या चालकाचे नियोजन एका कंत्राट कंपनीच्या माध्यमातून केले जाते. मात्र गेल्या ८ महिन्यापासून रूग्णवाहिका चालकाच्या कंत्राट कंपनीचा तोडगा निघालेला नाही. त्यामुळे रूग्णवाहिका चालक ८ महिन्यापासून वेतनविनाच सेवा पुरवित आहेत. चालकाची दिवाळीही देखील अंधारात गेली. सातत्याने वेतन मिळत नसल्याने चालकांपुढे कुटूंबाचा उदरनिवार्हाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरोग्य क्षेत्रामध्ये रूग्णवाहिका हे महत्वाचे साधन झाले आहे. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालयात रूग्णवाहिका पुरविण्यात आले आहे. यात १0२ क्रमांकाची सेवेचा समावेश आहे. या क्रमांकावर संपर्क करणार्‍या गरोदर माताना रूग्णवाहिकेची सेवा पुरविली जाते. एवढेच नव्हेतर या रूग्णवाहिकेच्या माध्यमातून इतर रूग्णांचे ने-आण केली जाते. रूग्णवाहिकांच्या चालकाचे कर्तव्याचे नियोजन गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राट कंपनीच्या माध्यमातून होत आहे. परंतु, गेल्या काही महिन्यापासून कंत्राट कंपनी नियुक्त करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे रूग्णवाहिका चालकांची सेवा कायम ठेवण्यात आली आहे. संसर्गाच्या काळातही रूग्णवाहिका चालकांनी जीवाची पर्वा न करता सेवा पुरविली. तुटपूंज्या मानधनातून रूग्णवाहिका चालक कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र गेल्या ८ महिन्यांपासून जिल्ह्यातीलच काय राज्यातील कंत्राटी रूग्णवाहिका चालकांचे वेतन देण्यात आलेले नाही. किंबहुना या संदर्भात आरोग्य विभागाकडून कसलेही पाऊल उचलण्यात आले नाही. आज ना उद्या वेतन मिळणार, या आशेवर रूग्णवाहिका चालक सेवा पुरवित असताना दिवाळी सारखा सण ही अंधारात गेला आहे. सलग ८ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने रूग्णवाहिका चालकांपुढे कुटूंबाचा उदरनिवार्हाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे संतापलेले रूग्णवाहिकेचे चालक तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.