मुंबई-राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांच्या खासगी स्वीय सहायक (पीए) आणि वाहनचालक (ड्रायव्हर) यांच्या वेतनात प्रतिमहिना प्रत्येकी ५ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. १ एप्रिल २०२२ पासून आमदारांच्या पीएला २५ हजारांवरून ३० हजार रुपये तर ड्रायव्हरला १५ हजारांवरून २० हजार रुपये अशी वाढ देण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय गेल्या मार्च महिन्यात झाला होता. याचा शासन निर्णय मंगळवारी जारी करण्यात आला. कोणत्याही कामगाराला, व्यक्तीला किमान १८ हजार रुपये वेतन दिले जावे, असे सरकारी (कामगार) कायदा सांगतो. मात्र, आमदारांच्या वाहनचालकांना १५ रुपये वेतन दिले जाते. त्यामुळे वेतनवाढीच्या मागणीने जोर धरला होता. ड्रायव्हर संस्थेतील कर्मचारी : राज्यातील बहुतांश आमदारांचे वाहनचालक (ड्रायव्हर) हे त्यांच्या विविध शैक्षणिक, सहकारी संस्थांत कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. अशा वाहनचालकांना संबंधित संस्थांमधून महिन्याला रितसर शासकीय नियमाप्रमाणे पगार मिळतो. काही काळापासून आमदारांच्या वाहनचालकांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जात आहेत. त्यावेळी काही आमदारांचे वाहनचालक वेगळे आणि पैसे वेगळ्याच व्यक्तीच्या खात्यात जमा होत असल्याचे समोर आले होते.
१२ वर्षात ५ हजाराचे ३० हजार : आमदारांच्या स्वीय सहाय्यकाला २००९ पर्यंत ५ हजार रुपये वेतन दिले जात होते. तर, वाहनचालकांना असे कोणतेही वेतन दिले जात नव्हते. आमदार आपल्या वेतन आणि सेवा – सुविधा भत्त्यातून ड्रायव्हरचा पगार देत होते. २०१० नंतर तो १० हजार रुपये झाला. स्वीय सहाय्यकांचे वेतन २०१६ मध्ये २५ हजार रुपये केले. तर वाहनचालकांना १५ हजार रुपये वेतन सुरु केले. तर आता २०२२ मध्ये पीएना २५ हजारांवरून ३० हजार तर वाहनचालकांना १५ हजारांवरून २० हजार रुपये वेतन करण्यात येत आहे.