राहुल गांधी म्हणाले – भाजपने कुटुंबात भांडणं लावली, ते तोडण्याचे काम करतात, आम्ही भारत जोडू

0
15

शेगाव-भाजपने देशात भय, तिरस्कार आणि हिंसा पसरवली आहे. याविरोधात माझी भारत जोडो यात्रा आहे. या देशाला हिंसेने आणि तिरस्काराने फायदा होणार नाही. रस्त्यावर चालणाऱ्यांनाही पाच मिनिटांत लक्षात येईल की, हिंसा कोण पसरवित आहेत, असा जोरदार घणाघात काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज शेगाव येथे केली. विशेषतः याआधीच्या सभेत त्यांनी सावरकरांविरोधात वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर टीकाही झाली. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा शेगावमध्ये असून आज त्यांची सभा झाली. यावेळी त्यांनी जनतेसह काॅंग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले.

देशातील अब्जाधिशांना सवलत

राहुल गांधी म्हणाले, भारत जोडो यात्रा केरळमधून महाराष्ट्रात सुरू झाली. विरोधकांनी सवाल केला होता की, यात्रेची काय गरज? या यात्रेचा काय फायदा होणार? मी म्हणतो देशातील कोनाकोपऱ्यात आज भाजपने हिंसा आणि भय उत्पन्न केले आहे. शेतकरी म्हणतात की आम्हाला मालाचा मोबदला योग्य मिळत नाही हे मला असंख्य शेतकऱ्यांनी सांगितले हे ऐकून मला त्रास होत आहे. शेतकरी म्हणतात आम्ही काय चुक केली. आमचे कर्ज माफ होत नाही पण देशातील धनाड्यांची, अब्जाधिशांची कर्ज माफ होतात.

आम्ही माणसे जोडू

राहुल गांधी म्हणाले, आपआपसांत भांडणे करुन कुणाचा फायदा झाला. महाराष्ट्रातील संतांनी कधी सांगितले का की, आपसांत भांडणे करा नाही ना..मग आपण का भांडतो? भाजपने कुटुंबात भांडणे लावली पण या भांडणांनी कुटुंबाचे नुकसान होत आहे. देशही एक कुटुंब आहे, या भांडणांनी देशाचा फायदा झाला का? भाजपने माणसे तोडण्याचे काम केले आम्ही ते जोडू.

महाराष्ट्राला विसरणार नाही

राहुल गांधी म्हणाले, शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आणि महाराष्ट्राचा आवाज आहे. त्यांना घडवण्याचे काम राष्ट्रमाता जिजाऊंनी केले. आपण मला प्रेम आणि सहकार्य केले, आपण आम्हाला खूप काही शिकवले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी खूप काही शिकवले. मी जीवनभर विसरणार नाही की, महाराष्ट्रातील जनतेने मला शक्ती, ज्ञान आणि प्रेम दिले.​

सभास्थळी जमलेले गर्दी.
सभास्थळी जमलेले गर्दी.

​​​​शेतकऱ्यांचे भले व्हावे

शेतकरी आत्महत्या का करतो. पन्नास हजार, एक लाखांचे कर्ज त्यांच्या डोक्यावर असते. परंतु ते आज वाऱ्यावर आहेत. या देशातील पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी जर मनात आणले आणि शेतकऱ्यांना हृदयाशी घेतले आणि त्यांची हाक ऐकली आणि थोडी जरी शेतकऱ्यांची मदत केली तर त्यांचे भले होईल.

बेरोजगारीचा प्रश्न कायम

राहुल गांधी म्हणाले, देशातील युवक बेरोजगार आहेत. महाराष्ट्रात फुकत शिक्षण मिळत नाही. मुलांचे पालक लाखो रुपये शिक्षणासाठी देतात पण पुढे काय होते? काय ऐकायला मिळते? काय काम करतात काहीच नाही. बेरोजगार आहे. उद्योगपती देशाची संपत्ती मिळवतील आणि युवक बेरोजगार होतील युवकांचे स्वप्न पूर्ण न होणारा भारत आम्हाला नको. स्वप्न पूर्ण करणारा भारत आम्हाला हवा आहे.

गजानन महाराजांचे घेतले दर्शन

राहुल गांधी यांनी सभेपूर्वी शेगावच्या मंदिरात संत गजानन महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी अभूतपूर्व सुरक्षा आहे. गजानन महाराज मंदिरात येण्याचा त्यांचा पूर्वनियोजित होता, त्यात मनसेच्या इशाऱ्यानंतरही कोणताही बदल करण्यात आला नसून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरूच राहील असे राहुल गांंधी यांनी यापूर्वीच सांगितलेले आहे.

राहुल गांधींचे भाषण सुरु होण्यापूर्वी जय जय महाराष्ट्र माझा गीताची धून वाजवण्यात आली. तत्पूर्वी आकाशात फटाक्यांची मोठी रोषणाई करण्यात आली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रातील शेगाव मध्ये आहे. आज ( १८ नोव्हेंबर ) शेगावात राहुल गांधींची सभा पार पडली. या सभेत बोलताना काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुलांच्या शिक्षणासाठी केंद्र सरकारकडे पैसे नाहीत. पण, पंतप्रधानां विमान घेण्यासाठी साडेआठ हजार कोटी रुपये आहेत, अशी टीका कन्हैया कुमार यांनी केली आहे.

“महाराष्ट्राची भूमी संत, सामाजिक सुधारकर्ते आणि देशाला स्वातंत्र्य देणाऱ्या क्रांतिकारकांची आहे,” असे म्हणत कन्हैया कुमार म्हणाले की, “देशात आपण टॅक्स भरतो, त्याबदल्यात सरकार आपल्याला अन्न, पाणी, वस्त्र निवारा देईल, अशी अपेक्षा असते. मात्र, काही वर्षापासून सर्वसामान्य लोकांच्या भावनांना समजून घेतलं जात नाही. टॅक्स आपल्याकडून वसूल करण्यात येतो, पण कर्जमाफी पंतप्रधानांच्या मित्रांना दिली जाते. आपण पंतप्रधानांचे मित्र असतो, तर कर्ज घेऊन आपल्याला चॅर्टर विमानाने पळून जाता आले असते,” असा टोलाही कन्हैया कुमार यांनी लगावला आहे.“पंतप्रधान सभांमध्ये बोलताना सांगतात, मी गरिबांचा मुलगा आहे. तुम्ही गरीब असता, तर देशातील शाळा का बंद केल्या जात आहेत. सरकारी नोकर भरती का केली जात नाही. कारण, यांना देशातील मुलांना शिक्षण, आणि रोजगार द्यायचा नाही. देशात सुरु असलेल्या लुटीविरुद्ध आपण एकत्र आलं पाहिजे. याच्या विरोधात बोललं तर आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे राहुल गांधी चोराला चोर तोंडावर बोलतात. चोराला तोंडावर चोर बोलल्यावर एक कट रचला जातो. त्या कटाविरोधात आपण एकत्र आलं पाहिजे,” असे आवाहनही कन्हैया कुमार यांनी केलं.