
वाशिम,दि.२६– सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समता पर्व साजरा करण्यात येत आहे.
यानिमित्ताने आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वाशिम येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अमोघ कलोती,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विजयकुमार टेकवाणी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ. छाया कुलाल,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.प्रभात फेरीमध्ये सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,जिल्हा जात पडताळणी समिती व जिल्हा समाज कल्याण, जिल्हा परिषद,वसतीगृहाचे कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले.
संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशीकेचे सामुहिक वाचन
वाशिम भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी तसेच नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी,याकरिता 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.या दिवसाचे औचित्य साधून जिल्हाधिकारीकार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात संविधान उद्देशीकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.यावेळी सहाय्यक अधीक्षक सुनील घोडे,जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार,नाझर आनंद आरू,विवेक नालट,सुधाकर गोडबोले,सुमित खडसे,महसूल सहाय्यक शितल पावडे,सुवर्णा सुर्वे, गजानन बोंबले यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
संविधान दिनी डॉ आंबेडकरांना अभिवादन करून १०१ जात वैधता प्रमाणपत्र वाटप
वाशिम, दि. २६ – २६ नोव्हेंबर या भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून आज वाशिम शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील त्यांच्या पुतळ्याला सकाळी अभिवादन करून पुतळ्याजवळ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मंडणगढ पॅटर्ननुसार जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप १०१ विद्यार्थ्यांना केले.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने जात वैधता प्रमाणापत्रांचे वाटप जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुलाल,संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मारोती वाठ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी समाज कल्याण कार्यालय व जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





