35.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्ग व मेट्रो रिच २ चे उद््घाटन ११ डिसेंबरला

पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्ग व मेट्रो रिच २ चे उद््घाटन ११ डिसेंबरला

0
30

blank

नागपूर-गेल्या अनेक दिवसांपासून मार्ग तयार असूनही तो उद््घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी मार्गाच्या उद््घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे नागपुरात उद््घाटन होणार आहे. याचवेळी नागपूर मेट्रोच्या रिच-२ (कामठी मार्ग) व रिच-४ (सेंट्रल एव्हेन्यू) या मार्गांचेदेखील उद््घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व प्रमुख नेतेही उपस्थित राहतील.
समृद्धी महामार्गाच्या उद््घाटनाची मागील अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा होती. त्याचप्रमाणे मेट्रो मार्ग तयार असतानादेखील सुरू होत नसल्याने जनतेतूनच प्रश्न उपस्थित होत होते. जानेवारी महिन्यात पंतप्रधान इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद््घाटनासाठी नागपुरात येणार आहेत. तेव्हाच हे उद््घाटन होईल, अशी शक्यता सर्वांकडूनच वर्तविण्यात येत होती. परंतु ११ डिसेंबरच्या तारखेला पंतप्रधानांकडून होकार देण्यात आला आहे. महा मेट्रोच्या सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान नागपूरला येण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ नागपूर आणि पुणे मेट्रो तसेच नाशिक मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्याला मंजुरी देण्याची दाट शक्यता आहे.
उद््घाटनापूर्वी नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग पूर्णत: तयार होईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील अधिकार्‍यांचे म्हणने आहे. विशेष म्हणजे, समृद्धी व मेट्रोच्या उद््घाटनाच्या तारखेने अधिकार्‍यांनादेखील आश्‍चर्याचा धक्का बसला आहे. ३ जानेवारीला इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद््घाटनासाठी पंतप्रधान नागपुरात येणार आहेत. त्यावेळी समृद्धी आणि नागपूर मेट्रो सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पंतप्रधानांनी तीन आठवड्याच्या कालावधीत दोनदा शहरात येण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पंतप्रधान नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्टच्या फुटाळा येथील म्युझिकल फाऊंटनचे लोकार्पण करणार नाहीत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी लोकांसाठी खुला करण्यापूर्वी ते आणखी विकसित करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.

blank